सातारा जिल्ह्यात दुर्घटना : दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत जनरेटचा स्फोट, 8 बालके गंभीर भाजली
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
महाबळेश्वर येथील कोळी आळीत दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत 5 केव्ही जनरेटरच्या इंधनाच्या पाईप लिकेज झाल्यामुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटात 8 लहान मुले भाजून गंभीर जखमी झाली आहेत. जखमींना महाबळेश्वर, वाई आणि सातारा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर काही मुलांची प्रकृती गंभीर झल्याने त्यांना पुण्याला पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे महाबळेश्वर तालुका हादरला असून जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
महाबळेश्वर येथील कोळी आळी मधील दुर्गामाता मंडळाची विसर्जन मिरवणूक निघाली होती. विसर्जन मिरवणूक मुख्य मार्गावरून जात असताना जनरेटरच्या पेट्रोल पाइपला गळती लागली आणि जनरेटरने पेट घेतला. या आगीत दुर्गादेवीच्या मूर्तीजवळ बसलेली चार ते सात वयोगटातील 8 मुले भाजली असल्याची माहिती समोर येत आहे. मुलांच्या अंगावरील कपड्याने पेट घेतल्याने मुले भाजली आहेत.सर्व जखमींना महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमी मुलांना पुढील उपचारासाठी सातारा येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काही मुलांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुण्याला पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सद्या या मुलांची प्रकृती स्थिर आहे.
या घटनेची माहिती मिळताच आमदार मकरंद पाटील यांनी वाईतील दसऱ्याचे कार्यक्रम सोडून साताऱ्यातील रुग्णालयात धाव घेतली. प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार तेजस्विनी पाटील यांना माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून माहिती घेतली. त्याचप्रमाणे सातारा येथील डॉक्टरांशी त्यांनी संपर्क साधून सूचना केल्या आहेत. सध्या सर्व मुले सातारा येथील रुग्णालयात पोहोचली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. माजी नगरसेवक संतोष शिंदे हे जखमी मुलांसोबत आहेत. काही मुले जास्त भाजल्याने आमदार मकरंद पाटील यांनी डॉक्टरांशी चर्चा करून त्यांना पुण्याला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.