गुडन्यूज! कोयना धरण निम्मे भरले : गेल्या 24 तासात 5.40 TMC पाणी वाढले
– विशाल वामनराव पाटील
सातारा जिल्ह्यात अजून पावसाचा जोर सर्वत्र पहायला मिळत नसला तरी कोयना धरणात गेल्या 24 तासात जोर वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात 5.40 टीएमसी पाणीसाठा वाढला असून सध्या धरणात 51. 93 टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे 105 टीएमसी पाण्याची क्षमता असलेले धरण निम्मे भरले आहे. कोयना परिसरात जोर वाढला असून सध्या धरणात प्रतिसेंकद 59 हजार 851 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे.
कोयनेत 51. 93 टीएमसी पाणीसाठा…
कोयना धरणात रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 51. 93 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण निम्मे भरले आहे. गेल्या 24 तासात कोयनेला- 150 मिलीमीटर, नवजा- 201 मिलीमीटर व महाबळेश्वरला- 185 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयनेला- 2065, नवजा- 2872 आणि महाबळेश्वरला- 2782 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
रविवारी दिवसभरात जिल्ह्यात पावसामुळे कुठे काय घडले
1) सकाळी 10.30 वा. पाटण तालुक्यातील निगडे- कसणी- निवी- वाझोली चव्हाण वाडी रस्त्यावर वाझोली गावाजवळ दोन ते तीन ठिकाणी मोठी दरड रस्त्यावर आली होती. अर्ध्या तासात JCB च्या सहाय्याने दरड बाजूला करून रस्ता वाहतुकीस सुरळीत करणेत आला.
2) दुपारी 1. 30 वा. पाटण तालुक्यातील भोसगाव- अँब्रूलकरवाडी- कोळेकरवाडी रस्त्यावर दोन ठिकाणी मोठी दरड रस्त्यावर आली होती. अर्ध्या तासात JCB च्या सहाय्याने दरड बाजूला करून रस्ता वाहतुकीस सुरळीत करणेत आली.
3) दुपारी 2.00 वाजता भिलार- उंबरी- धावली रस्त्यावर दोन मोठी दगड रस्त्यावर आली होती. अर्ध्या तासात JCB च्या सहाय्याने दगड बाजूला करून रस्ता वाहतुकीस सुरळीत करणेत आली.