दोन गटातील राड्यात उंब्रज पोलिसांकडून 9 जणांना अटक

उंब्रज | शिवडे (ता. कराड) येथील मसूर फाटा येथे दोन दिवसांपूर्वी जुन्या भांडणाच्या कारणावरून युवकांच्या दोन गटांत झालेल्या मारामारी प्रकरणातील परस्परविरोधी दाखल गुन्ह्यातील नऊ संशयितांना उंब्रज पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात हर्षद हणमंत माने (रा. शिरवडे), आदित्य दादासाहेब शितोळे (रा. अंधारवाडी), संकेत गजानन माने, तुषार संजय माने (दोघे रा. शिरवडे), ऋषिकेश दादासाहेब माने (रा. चरेगाव), मंजा ऊर्फ गणेश किसन पोळ (रा. कोर्टी), मयूर शंकर थोरात (रा. कळंत्रेवाडी), संग्राम जयवंत थोरात (रा. कोर्टी), गण्या ऊर्फ पृथ्वीराज युवराज थोरात (रा. कोर्टी) असे मारामारीप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या कराड तालुक्यातील संशयितांची नावे आहेत.
दरम्यान, मारामारीप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल होताच सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे यांनी तातडीने तपास पथक तयार करून अकरापैकी नऊ संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने संशयितांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे करीत आहेत.