मसूरच्या ग्रामसभेस सदस्यांसह ग्रामस्थांची पाठ तर अधिकाऱ्यांची दांडी
वीज वितरणच्या अधिकाऱ्याचा बदलीचा ठराव मंजूर
मसूर प्रतिनिधी| गजानन गिरी
कराड तालुक्यातील मसूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेस सदस्यासह ग्रामस्थांनी पाठ फिरवल्याचे चित्र पहायला मिळाले. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामसभेस निमंत्रित करूनही शासकीय अधिकाऱ्यांनीही दांडी मारली. या सभेत वीज वितरणचे कामचुकार व अकार्यक्षम अधिकारी ऋषिकेश नलवडे यांच्या बदलीचा ठराव उपस्थित सदस्यांनी एकमातने मंजूर केला. सरपंच पंकज दीक्षित सभेच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा पार पडली. एकंदरीत सदस्यांसह ग्रामस्थांची पाठ तर अधिकाऱ्यांची दांडी ग्रामसभेस दिसली.
ग्रामसभेस जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक लहूराज जाधव, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, जागृत ग्राहकराजा संघटनेचे राज्य संघटक दिलीपराव पाटील, ग्रामविकास अधिकारी विकास पाटील, सदस्य रमेश जाधव, संजय शिरतोडे, बंडा चव्हाण, सुनील जगदाळे, कैलास कांबळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष नरेश माने, पशुसंवर्धनचे डॉ. कोकरे, ॲड. रणजीतसिंह जगदाळे, पर्यवेक्षिका वंदना केंजळे, अंगणवाडी सेविका मदतनीस आदीं उपस्थित होते. सभा सुरू होताना ओडिसाच्या रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ग्रामसभेस महसूल विभागासह गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला. सर्व शासकीय कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तक्रारीसाठी फलकावर फोन नंबर लिहावेत. वीज वितरण कंपनीच्या वीज कनेक्शन संदर्भात भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी. भ्रष्टाचाराबाबत अर्ज दिल्यावर पोलीस, लाच लुचपत विभाग कारवाई करते. तेव्हा वीज कंपनीचे अधिकारी व ग्राहक यांच्या झालेल्या बैठकीत काही एजंट पैसे घेऊन काम करत असल्याचे तक्रारी झाल्या याबाबत वरिष्ठांनी दखल घेऊन पुढील ठोस कारवाई करावी, या सर्व विषयावर ठराव करण्यात आले. मसूर- किवळ रस्ता अत्यंत खराब असून प्रतिवर्षी डांबरीकरण न करता रस्त्यावरील फक्त खड्डे बुजवले जातात. प्राथमिक शाळेची पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावा. यासाठी शालेय शिक्षण कमिटीने सहकार्य करावे.
दहावी- बारावीच्या गुणवंतांचे. मसूर क्रीडा मंडळाचे खेळाडू व जय हनुमान तालीम मंडळाचा मल्ल सोहम मोरे याची 71 वजन गटात भारतीय संघात निवड झाल्याबद्दल व मुंबई पोलीस दलात अभय सोनावले याची निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. लहूराज जाधव, दिलीप पाटील, प्रा कादर पिरजादे, संजय शिरतोडे, नरेश माने, संभाजी बर्गे, रमेश जाधव, अॅड अमरसिंह जगदाळे, शिवाजी माने, सूर्यकांत बाजारे आदींनी सभेत तक्रारी मांडल्या. ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव यांनी आभार मानले.
ग्रामसभेबाबत निरूत्साह का?
मसूर सारख्या निमशहरी गावात मोठी ग्रामपंचायतची सदस्य संख्या 17 असताना ग्रामसभेस केवळ पाच सदस्य उपस्थित होते. या सभेकडे ग्रामस्थांनीही पाठ फिरवली. तरीही कोरम पूर्ण करीत सभा पार पडली. वास्तविक ग्रामसभेबाबतची माहिती ध्वनीक्षेपकाद्वारे गावातून दिली जाते. तरीदेखील सभेबाबत निरुत्साह का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.