पाटण शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
पाटण | पाटण शहरासह तालुक्याला आज दुपारी वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने झोपडपले. आज सोमवार पाटणचा आठवडी बाजार असल्याने 4 वाजता अचानक आलेल्या पावसाने बाजारकरूंची मोठी तारांबळ उडाली. शिवाय व्यापारी, दुकानदार यांची पाले जोरदार वाऱ्याने उडून गेल्याने अनेकांचा शेतमाल भिजून मोठे नुकसान झाले. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तर कराड तालुक्यात काही ठिकाणी आभाळ आले मात्र, पावसाने हुलकावणी दिली.
आज लग्नसराईचा मोठा मुहूर्त असल्याने अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची मोठी धांदल उडाली. पाटण शहरातील मुख्य बाजारपेठेत अवघ्या काही मिनिटे पडलेल्या पावसाने पाणी पाणी केले. तसेच मोठ- मोठ्या गारांचा पाऊस पडला. पाटण, कोयनानगर भागालाही पावसाचाही तडाखा बसला.
सद्या उन्हाळी भुईमूग काढण्याची सर्वत्र लागभग सुरू असताना पावसामुळे व्यत्यय आला. यावर्षी तालुक्यात आंबा उत्पादन घटल्याने अजून बाजारात आंबा दाखल ही झालेला नाही, त्यातच अवकाळी पावसामुळे जो काही थोड्या फार प्रमाणात आंबा झाडाला आला आहे. तोही जोरदार वाऱ्याने पडून नुकसान झाले आहे, वीट उत्पादक व्यावसायिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.