महाबळेश्वर- वेण्णा परिसरात अनाधिकृत बांधकामावर हातोडा (Video)

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
महाबळेश्वर- वेण्णा लेक परिसरातील वेण्णा नदीपात्रात बांधण्यात आलेल्या अनाधिकृत बांधकामावर नगरपालिकेकडून सकाळी सकाळीच हातोडा मारण्यास सुरूवात केली आहे. या कारवाईमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मुख्याधिकारी योगेश पाटील स्वतः कारवाईच्या ठिकाणी ठाण मांडून आहेत.
गेल्या अनेक दिवसापासून जिल्हाधिकारी यांनी कारवाईचा आदेश देण्यात आला होता. परंतु, सदरील ठिकाणी कारवाई होत नसल्याने अतिक्रमण करणाऱ्यांचे चांगलेच फावले होते. अखेर आज सकाळी महाराष्ट्राचे मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वर येथील वेण्णा लेक या पर्यटन स्थळावरील अनाधिकृत बांधकामावर हातोडा पडल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या धाडसी कारवाईमुळे मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. तसेच महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात अनाधिकृत बांधकामावरही कारवाई होईल, अशी आशा आता सामान्य लोकांच्यातून होताना दिसत आहे.
कासला अनाधिकृत बांधकामावर कारवाई होणार?
महाबळेश्वर सोबत सातारा जिल्ह्यातील कास पठार परिसरात अनेक अनाधिकृत बांधकामे उभारण्यात आली असून तेथेही कारवाईचे आदेश दिलेले आहेत. मात्र, या ठिकाणी अद्याप कारवाई करण्यात आलेली नसल्याने प्रशासन कारवाईस टाळाटाळ का करते असा सवाल उपस्थित केला जात आहे. आज महाबळेश्वर येथील कारवाई नंतर आता कास येथील अनाधिकृत बांधकामावर लवकरच हातोडा चालेल असे बोलले जात आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि प्रशासन नक्की कारवाई करणार की बड्या धेंड्यांना पाठीशी घालणार याकडे व्यावसायिकांसह सामान्याचे लक्ष लागून आहे.