वाई तालुक्यात दोन गावांना जोडणारा रस्ता गेला वाहून : वाई, महाबळेश्वरला पावसाने झोडपले
सातारा । जिल्ह्यातील वाई तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. बलकवडी धरण परिसरातील आणि महाबळेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम जोर भागातील दोन गावांना जोडणारा रस्ता वाहून गेला आहे. डोंगरातून येणारे पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने गोळेवाडीला जोडणारा रस्ता सुद्धा वाहून गेला आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं वाई तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोर हे सातारा तालुक्यातील दुर्गम भागातील गाव असून या भागात पावसाचा जोर वाढला आहे.
आतापर्यंत जोर या ठिकाणी 311 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. प्रतापगड – 235, महाबळेश्वर- 241, पाचगणी -१०७, बामनोलीत 119 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पाटण तालुक्यातील नवजा येथे 317 मिलिमीटर झाला आहे.
कास रस्ता वाहतुकीसाठी बंद
सततच्या पावसामुळे कास तलावाचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे. त्यामुळे नेहमीचा प्रचलित रस्ता कास बंगला ते कास गाव हद्दीत असलेली फॉरेस्ट चौकी अखेर वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने कळविले आहे.
वेण्णालेक तुंडूब भरून वाहू लागले
महाबळेश्वर येथील वेण्णालेक भरल्याने सांडव्यावरून पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे. महाबळेश्वर, पाचगणी मार्गावर अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर आल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.