सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला : कोयना धरणात 4 हजार 309 क्युसेस प्रतिसेंकद पाण्याची आवक
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
सातारा जिल्ह्यात पावसाने काल रात्रीपासून चांगलाच जोर धरला असून कोयना धरण परिसरासह, महाबळेश्वर, कराड, पाटण व साताऱ्यात जोरदार पाऊस पडत आहे. तर साताऱ्यातील पूर्वेकडिल माण- खटाव, कोरेगाव, फलटण भागातही पावसाने पहिल्यांदाच रिमझिम सुरूवात केली आहे. कोयना धरणात प्रतिसेंकद 4 हजार 309 क्युसेस पाण्याची आवक सुरू असून धरणात 93. 34 टीएमसी पाणी साठलेले आहे. कोयना धरण यावर्षी 100 टक्के भरणार का याकडे सातारा व सांगलीकरांचे लक्ष लागलेले आहे.
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात रविवार (दि. 1 आॅक्टोबर) सकाळी 8 वाजेपर्यंत धरणात 93. 34 टीएमसी पाणीसाठा असून कोयना धरण पूर्णक्षमतेने भरण्यासाठी अजून 11. 66 टीएमसी पाण्याची गरज असल्याने नदीपात्रात पाणी सोडले जात नाही. कोयना धरण परिसरात 6 मिलीमीटर, नवजा 5 मिलीमीटर तर महाबळेश्वरला 16 मिलीमीटर पाऊस गेल्या 12 तासात पडला आहे. जिल्ह्यातील पूर्वेकडिल माण- खटाव, कोरेगाव व फलटण भागात अनेक ठिकाणी दुष्काळ परिस्थितीत असताना कालपासून पावसाने रिमझिम सुरू केली आहे.
कोयना धरण पूर्ण भरणार का?
गेल्या 2-3 दिवसात तर कालपासून पावसाने चांगला जोर धरला असला तरी कोयना धरण क्षेत्रात सरासरी 5 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे. कोयना धरण भरण्यासाठी असाच पाऊस सुरू राहिल्यास किमान पुढील 10 ते 12 दिवस पावसाची आवश्यकता आहे. तेव्हा या परिसरात मुसळधार पावसाची गरज आहे, मुसळधार पाऊस पडला तरच धरण 100 टक्के भरू शकते. त्यामुळे चालू वर्षी कोयना धरण 100 टक्के पूर्ण भरणार का?