मसूर ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय : आई- वडिलांना न सांभाळणाऱ्या शासकीय लाभ व दाखले मिळणार नाहीत

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना कोणताही शासकीय लाभ किंवा दाखले न देण्याबाबतचा ऐतिहासिक ठराव कराड तालुक्यातील मसूर ग्रामपंचायतीने केला आहे. तसेच नावामध्ये स्वतःचे नाव त्यानंतर आईचे, वडिलांचे व आडनाव असे क्रमशा लावावे, असा धोरणात्मक निर्णयाचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. मसूर ग्रामपंचायतीच्या या ऐतिहासिक निर्णयाचे समाजातून स्वागत होत आहे. मसूर ग्रामपंचायतीच्या गाळे लिलाव, घरपट्टी, आकाश दूध केंद्राच्या केमिकलयुक्त पाण्याचा मुद्दा तसेच लाॅजवरील गैरप्रकार आळा घालण्याच्या मुद्यावरून ग्रामसभा चांगलीच गाजली.
सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पंकज दीक्षित होते. माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे, जिल्हा बँकेचे संचालक लहुराज जाधव, जागृत ग्राहक राजा संघटनेचे राज्य संघटक दिलीप पाटील, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, प्रा. कादर पिरजादे, ऍड. रणजितसिंह जगदाळे, वैद्यकीय अधिकारी मैथिली मिरजे, वीज वितरणचे नलवडे , जलयुक्तचे अभियंता आदिनाथ शिरसाठ, तंटामुक्तीचे अध्यक्ष नरेश माने, माजी उपसरपंच संजय शिरतोडे, सदस्य रमेश जाधव, सुनील जगदाळे, संग्रामसिंह जगदाळे, प्रमोद चव्हाण यांच्यासह शिक्षण विभाग, अंगणवाडी विभाग, आरोग्य विभाग व आशा वर्कर्स ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवक गणेश गोंदकर यांनी प्रश्नांचे स्पष्टीकरण केले. संभाजी जालिंदर जगदाळे, प्रकाश जाधव, वामन शिरतोडे, सुरेश पाटील, सुमित शहा आदींनी सभेत प्रश्न मांडले.
ग्रामसभेत लिलाव झालेल्या काही गाळ्याची अनामत विकास कामांसाठी किंवा एफडीसाठी करणार का? या संदर्भात ग्रामपंचायत काय निर्णय घेणार? गाळ्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा याबाबत चर्चा झाली. प्राथमिक मुलांच्या शाळेच्या इमारतीला मोठी गळती असून शाळा खोल्यांच्या स्लॅबचे तुकडे खाली पडतात. अनेक वेळा तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. मुलांची बसण्यासाठीची पर्यायी व्यवस्था करावी. पेयजल योजनेमुळे पाईपसाठी खोदलेल्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने त्रासदायक ठरत आहे. चौकात मुख्य ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा करावी. कराड – कोरेगाव बसमध्ये विद्यार्थ्यांसाठी दुजाभाव केला जात आहे. यासह घरकुलाच्या सर्वे बाबत चर्चा झाली. मसूरला मंडल अधिकारी कार्यालयात न येता कामकाजासाठी कराडलाच लोकांना बोलवतात. तलाठी सभेला बोलवूनही उपस्थित राहिले नाहीत. या चर्चेसह मसूरला पोलीस स्टेशन लवकर सुरू करावे. जेठाभाई उद्यान जवळची अतिक्रमणे काढावीत. आमदार बाळासाहेब पाटील यांनी पाण्यासाठीचे केलेले आंदोलन यशस्वी यावरही चर्चा झाली. मसूर नंबर एक सोसायटीस तालुकास्तरीय पुरस्कार, पत्रकार बाळकृष्ण गुरव यांची कराड उत्तर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याने आणि मसूर ग्रामपंचायतला वनराई पुरस्कार मिळाल्याने अभिनंदनाचे ठराव मांडण्यात आले.
अनेक मुद्यांवरून ग्रामसभा चांगलीच गाजली
यशवंतराव चव्हाण शॉपिंग सेंटर मधील काही गाळे न्यायप्रविष्ठ असताना लिलावाद्वारे जवळच्याच लोकांना रेडी रेकनेकर मूल्यांकनाने दिले. चुकीच्या पद्धतीचे मूलभूत सुविधा न देता घरपट्टी आकारणी केली जात आहे. मसूर नजीकच्या एका लॉजवरील चाळ्यांच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासंदर्भात पोलिसांनी लक्ष घालावे. आकाश दूध केंद्राच्या केमिकलयुक्त पाण्याची तक्रार प्रदूषण मंडळाकडे मांडूनही दुर्लक्ष झाल्याने पंधरा दिवसात दखल न घेतल्यास केंद्राला टाळे ठोकण्यात यावेत. कमिटीला विश्वासात न घेता जलजीवन पेयजलचे काम सुरू यासह विविध विषयावर मसूरच्या ग्रामसभेत जोरदार चर्चा झाली.



