महाबळेश्वरला पर्यटक राईडवेळी घोडा 30 फूट कोसळला : पर्यटक बचावला
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
महाबळेश्वरमधील लॉडविक पॉईंट परिसरात डेन टू बियर शिबा या राईडवर पर्यटक सेल्फ राईड करत असताना घोडा पाय घसरून थेट दरीनजीक असलेल्या 30 फूट खोल खड्ड्यात कोसळल्याने जखमी झाला. पर्यटक युवकाने या घोड्यावरून उडी मारल्याने सुदैवाने युवक बचावला. दोन तासाच्या प्रयत्नाने या घोड्यास खड्ड्यामधून बाहेर काढण्यात यश आले.
शहरापासून अंदाजे 5 किमी अंतरावर लॉडविक (हत्तीचा माथा) पॉईंट असून येथे एका बाजूला डेन टू बियर शिबा ही जंगलातील वाट आहे. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास लॉडविक पॉईंट पाहण्यासाठी पुणे येथून पर्यटक युवकांचा एक ग्रुप आला होता. या ग्रुपमधील एका पर्यटक युवकाने घोड्यावरून रपेट मारण्यासाठी घोडे व्यावसायिकाला सांगितले. राईड मारताना घोडा खड्ड्यात कोसळला मात्र, सुदैवाने घोड्यावरील युवक बचावला आहे.
रेलींग नसलेल्या व खोल दरी असलेल्या राईडवर घोड्यासह हा पर्यटक राईडसाठी गेला असता पाय घसरून हा घोडा थेट दरी नजीक असलेल्या 30 फूट खोल खड्ड्यात कोसळला. प्रसंगावधान राखत घोड्यावर असलेल्या पर्यटक युवकाने उडी मारली. त्यास किरकोळ दुखापत झाली आहे तर घोडा देखील जखमी झाला.