येळगावात रात्रीत बंद 7 घरे व गांधी ज्वेलर्स फोडले : उंडाळे परिसरात घबराट

कराड | तालुक्यातील येळगाव येथील बंद असलेली 7 घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना समोर आली असून याबाबत पोलिस अधिक माहिती घेत आहेत. कराड शहरातील गांधी ज्वेलर्स यांचेही येळगाव गावाकडील दुकान चोरट्यांनी फोडले आहे. चोरट्यांनी बंद घरांना टार्गेट केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे चोरीचा तपशील अद्याप समजू शकला नाही.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, उंडाळे भागातील येळगाव या गावात रात्री लाईट नसताना चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य केले. गावातील बंद घरे फोडल्याने चोरीची घटना नागरिकांच्या लक्षात लवकर आली नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उंडाळे पोलिस चाैकीतील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. या चोरीने उंडाळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी कराड तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंदराव खोबरे, अर्चना शिंदे यांच्यासह डाॅग पथक दाखल झाले आहे.
सदरील चोरीच्या घटनेची माहिती कराड तालुका पोलिस ठाण्यात दिली असून डाॅग पथक येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. चोरट्यांनी ज्या घरांना टार्गेट केले ती घरे बंद होती. या गावातील बऱ्यापैकी लोक मुंबई येथे नोकरीनिमित्त असल्याने घरे बंद असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कराड शहरातील प्रसिध्द गांधी ज्वेलर्स याचे मूळ गाव येळगाव असून त्याचे 50 ते 50 वर्षाहून अधिक जुने असलेले ज्वेलर्सचे दुकानही चोरट्यांनी फोडले आहे. परंतु, या सर्व घटनेत नेमकी कोणाच्या घरी किती चोरी यांचा तपशील समजू शकला नाही.