राज्यात अन् जिल्ह्यात महायुतीत आठवले गटावर अन्याय : अशोकराव गायकवाड
कराड – राज्यात अन् सातारा जिल्ह्यात सांगताही येईना अन् सोडताही येईना अशी अवस्था महायुतीत झाल्याचे खुद्द आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी कबुली दिली. या कबुलीमुळे महायुतीत भाजपाकडून दुय्यम वागणूक दिली जात असून आगामी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या दिवशी वेगळा निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
कराड येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. गायकवाड बोलत होते. यावेळी आप्पासाहेब गायकवाड याच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचा वर्धापनदिन 3 आॅक्टोबर 2024 रोजी सातारा येथे होणार असून त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. आम्ही सातारा जिल्ह्यात भाजपा सोबत नसतो तर खासदार झाला नसता.
जिल्ह्यात पालकमंत्र्याकडूनही अन्याय
सातारा जिल्ह्यात आरपीआय आठवले गटाला डीपीडीसीत डावलले. निवडणुक आली की मतदानासाठी आमची आठवण सर्वांना होते. माझ्यासाठी वाई मतदार संघ असून तेथे मी 17 ते 18 हजार मते घेतली होती. पाटण तालुक्यातही आमचा प्रभाव असून तेथे 20 मते घेवू शकलो. तेव्हा आम्ही निवडूण येणारे नसलो तरी निवडूण आणणारे अन् पाडणारे आहोत, असा इशारा जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी महायुतीतील प्रमुख पक्षांना दिला आहे.
रामदास आठवले यांच्या मनातही खदखद
काॅंग्रेसला आम्ही सोडले त्यानंतर 2014 पासून महायुतीत भाजपसोबत आहोत. परंतु, रामदास आठवले यांना सोडले तर कोणालाच मंत्रीपद किंवा पद दिले नाही. कार्यकर्त्यांचा सन्मान होत नसल्याची खदखद साहेबांच्या मनातही आहे. त्यामुळे 3 आॅक्टोबरला आम्ही वेगळाही निर्णय घेवू शकतो. आजपर्यंत भाजपाकडूनही आमची अवहेलना झाली असल्याचे जिल्हाध्यक्ष श्री. गायकवाड म्हणाले.
पक्षाला चिन्ह मिळालं…
यापूर्वी आम्ही जागा मागितली तेव्हा म्हणायचे तुम्हाला चिन्ह नाही. आता आमच्या पक्षाला ऊस धारक शेतकरी चिन्ह मिळालं आहे. तेव्हा आम्ही शेतकरी, कष्टकरी आणि गोरगरीबांना न्याय देवू शकतो, असेही जिल्हाध्यक्ष म्हणाले.