रेल्वेच्या कामासाठी बेसुमार व बेकायदा मुरूमाचा उपसा : प्रशासकीय अधिकारी झोपेच्या सोगेतं
कराड | कराड तालुक्यातील अनेक ठिकाणी रेल्वे रूळाचे काम सुरू असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मुरूम आणून टाकण्यात येत आहे. रेल्वेच्या कामाला लागणारा मुरूम नक्की कोठून येतोय अन् त्याला आवश्यक परवानग्या घेण्यात आलेल्या आहेत का यांची चाैकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांच्यातून होवू लागली आहे. कारण भरमसाठ मुरूम आणून टाकण्यात येत असून त्यावर कोणाचे नियंत्रण नसल्याचे एकंदरित पहायला मिळत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, कराड तालुक्यातील बेलवाडी ते शेणोली या दरम्यान रेल्वेचे काम सुूरू आहे. या कामासाठी मसूर भागातील कालगाव, अंतवडी, मसूर परिसरातून तर वडगाव हवेली भागातून वडगाव, शेणोली आणि संजयनगर येथून भरमसाठ मुरूमाचे उत्खनन सुरू आहे. एखाद्या शेतकऱ्याला शेतीकामासाठी किंवा घरकामासाठी मुरूम आवश्यक असल्यास अनेक जाचक अटी घातल्या जातात. त्यामुळे सामान्य लोकांचे काम रखडलेले पहायला मिळते. अशावेळी रेल्वेच्या कामाला भरमसाठी मुरूम सहजासहजी उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सामान्यांना एक न्याय व शासनाच्या कामांना एक न्याय असा दुजाभाव का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
सध्या रेल्वेच्या कामांना मुरूम लागत असून ते शासकीय काम असल्याचे सांगितले जात आहे. तर 100 ब्रास उत्खननाचा परवाना घेवून हजारो ब्रास मुरूम उत्खनन केले जात आहे. तेव्हा या बेसुमार व बेकायदेशीर मुरूम उत्खननावर कोण आळा आणणार की कुंपनच शेत खातं या म्हणीप्रमाणे यामध्ये अधिकारीच सामील आहेत, अशी शंका घेतली जात आहे. या सर्व उत्खननांची चौकशी करण्याची मागणी विविध संघटना करणार आहेत, तसेच जन आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत.