कराड बसस्थानकाची राज्यस्तरीय समितीकडून पाहणी
कराड | हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने सातारा जिल्ह्यातील कराड बसस्थानकाची पहाणी केली. या प्रसंगी समितीने कराड बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक कक्ष, आगार व्यवस्थापक कक्ष, प्रवासी आरक्षण कक्ष, पुरुष व महिला स्वच्छतागृह, चालक-वाहक विश्रांती गृह, आरक्षण खिडकी, पास विभाग चौकशी खिडकीची पाहणी करून तेथील कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. तसेच विविध रजिस्टर व फाईलची पाडताळणी केली.
आगारातील कार्यशाळेत एस. टी. बसची स्वच्छता व्यवस्थित केली जाते की? नाही याचीही कटाक्षाने पाहणी केली. यावेळी एसटीच्या विविध सवलतींची माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्याच्या सूचनाही या समितीने केल्या. कराड बस स्थानकाची स्वछता पाहून समितीने समाधान व्यक्त केले. बोलक्या भिंती व कराड बस स्थानकात केलेली आकर्षक रंगरंगोटी आणि सेल्फी पॉईंटचे समितीने काैतुक केले. बगीचा पाहून अजून सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. समितीने कराड नंतर मसूर, उंब्रज व काशीळ बस स्थानकाची ही पाहणी केली.
सदरच्या समितीची कराड आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा पोळ व कुलदीप डुबल यांनी स्वागत केले. यावेळी आगारात श्री. जमाले, श्री. साळुंखे, श्री. वीर तसेच अमित कोळी, दीपक महाजन, सुरेखा साळुंखे, जगन्नाथ शिंदे, अनिल सावंत, सुरज पाटील, प्रमोद पोळ, तसेच वाहतूक नियंत्रक ,कार्यशाळा कर्मचारी व चालक- वाहक उपस्थित होते.