सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 72 तासांनी सुरू : दंगलीनंतर बंद मागे, व्यवहार आजपासून सुरू

सातारा | साताऱ्यातील पुसेसावळी येथे रविवारी रात्री उशिरा झालेल्या दोन गटातील राड्यानंतर प्रशासनाने जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे 72 तास इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तसेच सातारा जिल्ह्यातील कराड, पुसेसावळी, सातारा शहर यासह अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला होता. या राड्यात एकाचा मृत्यू तर 10 जण जखमी झाले आहेत. तर 15 जणांना (दि. 16 पर्यंत) पोलिस कोठडी सुनावली असल्याने पुसेसावळीत बेमुदत बंद पुकारला होता. मात्र, प्रशासन व नागरिकांच्या चर्चेनंतर आज बेमुदत बंदही मागे घेण्यात येणार असून जिल्ह्यातील ठप्प झालेले व्यवहार सुरळीत सुरू होणार आहेत.
पुसेसावळी येथे आक्षेपार्ह पोस्टनंतर झालेल्या दंगलीत नूरसहन शिकलगार (वय- 27) यांचा मृत्यू झाला. या घटनेत आतापर्यंत 34 जणांना अटक केली असून 4 जण पसार आहेत. पोलिस सीसीटीव्ही तपासत असून युवकांना ताब्यात घेत असल्याने पुसेसावळी व भागातील युवक पोबारा करत आहेत. तसेच बुधवारी सकाळी बाजारपेठ सुरू करण्यास प्रशासनाने आवाहन केले. यावेळी व्यापारी, नागरिकांनी एकत्रित येत या घटनेशी संबध नसलेल्यांना अटक होत असल्याचे म्हटले. तेव्हा पोलिसांनी कोणावरही अन्याय होणार नाही. योग्य कारवाई केली जाईल, ज्या युवकांचा घटनेशी संबध नसेल त्याच्यावर अन्याय होणार नाही. अशी ग्वाही दिल्याने आजपासून बाजारपेठ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
शनिवार पर्यंत १५ जणांना पोलिस कोठडी
दंगलीप्रकरणी औंध पोलिसांनी बुधवारी सहा जणांना अटक केली. याप्रकरणी दोन दिवसांत अटक केलेल्यांची संख्या 15 असून, त्यांना वडूज न्यायालयाने (ता. 16) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत. या प्रकरणी एकूण तीन गुन्हे दाखल असून, त्यात शासकीय कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्याचाही समावेश आहे. बुधवारी जोतीराम भाडुगळे, किशोर कदम, जयराम नागमल, किरण घार्गे, विजय निंबाळकर, सोमनाथ पवार, शिवाजी पवार, श्रीनाथ कदम, दादासाहेब माळी (सर्व रा. ज.स्वा. वडगाव) यांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली. याचबरोबरच महेश कदम, विकास घार्गे (रा. ज.स्वा. वडगाव), अनिरुद्ध देशमाने (रा. पुसेसावळी), नीलेश सावंत, सागर सावंत, प्रमोद कोळी (रा. गोरेगाव-वांगी) हे देखील अटकेत आहेत. या 15 जणांना बुधवारी वडूज येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्या सर्वांना (ता. 16 पर्यंत) पोलिस कोठडी सुनावली.