स्मार्ट माजी मुख्यमंत्र्यांकडून स्मार्ट शाळांसाठी दीड कोटीचा निधी
कराड दक्षिणेतील तीन जिल्हा परिषद शाळांचा लूक बदलणार

कराड :- मूलभूत विकासाची पायाभरणी करण्यामध्ये लोकप्रतिनिधींची महत्वाची जबाबदारी राहते. हा विचार कायम मनात ठेवून चालणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण हे एक कायम तत्पर असणारे नेतृत्व आहेत. त्यांनी आतापर्यंत शिक्षण, आरोग्य व पायाभूत विकासाला प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तीन जिल्हा परिषद शाळांचा स्मार्ट विकास साधण्यासाठी स्मार्ट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तब्बल १ कोटी ५२ लाख ५० हजार रुपयाचा निधी शासनाकडून प्राप्त केला आहे.
आ. चव्हाण यांनी यावर्षी त्या – त्या गावातील मागणीनुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे १० जिल्हा परिषद शाळांच्या देखभाल व दुरुस्तीअंतर्गत निधीची मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा प्राधान्याने विचार करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषद शाळांची विशेष दुरुस्ती करण्यासाठी निधी दिला आहे. याद्वारे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तीन जिल्हा परिषद शाळांना तब्बल १ कोटी ५२ लाख ५० हजार रुपयाचा निधी शासनाकडून नुकताच प्राप्त झाला आहे. सदरच्या निधीचा प्रशासकीय मंजुरीचा आदेशही जारी झाला आहे.
यामध्ये जिल्हा परिषद शाळा व कंसात मिळालेला निधी असा ; जिल्हा परिषद शाळा, सैदापूर (१५ लाख २५ हजार), मनव (१ कोटी २२ लाख), बेलवडे बुद्रुक (१५ लाख २५ हजार) आदी शाळांचा समावेश करण्यात आला आहे. या निधीतून सदरच्या शाळांची दुरुस्ती व नुतनीकरण होवून या शाळांचा लूक बदलणार आहे.
अंगणवाड्यासाठी एकवेळेस तब्बल ८ कोटींचा निधी
आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात नव्याने अंगणवाड्या उभारण्यासाठी एकावेळेस तब्बल ८ कोटी रुपयांचा निधी दिला होता. ग्रामीण भागात शेवटच्या घटकाच्या विकासासाठी तेथील शिक्षण क्षेत्रात विकास करायचा असेल, तर त्याची सुरुवात अगदी तळागाळातून व्हायला हवी. हे विचार त्यांनी मुख्यमंत्री असताना सत्यात साकारले. म्हणून त्यांनी अंगणवाड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आठ कोटी रुपयांचा निधी दिला. व त्या निधीची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. याद्वारे त्यांची विकासाची दृष्टी किती प्रगल्भ आहे, याची प्रचिती येते.



