कराड बाजार समिती आणि पालिकेत संरक्षण भिंतीवरून वादावादी : पोलिस फाैजफाट्यासह शेकडोंचा जमाव
कराड | विशाल वामनराव पाटील
कराड बाजार समिती आणि नगरपालिका प्रशासन यांच्यात संरक्षण भिंत पाडण्यावरून आमनेसामने आले आहे. पालिका प्रशासन सकाळीच पोलिस बंदोबस्त घेवून संरक्षण भिंत पाडण्यासाठी बाजार समितीत दाखल झाले होते. त्यानंतर बाजार समितीचे संचालक, व्यापारी आणि शेतकरी यांनीही घटनास्थळी धाव घेत भिंत पाडण्यास विरोध केला. यावेळी मुख्याधिकारी शंकर खंदारे आणि बाजार समितीचे पदाधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. बाजार समितीच्या आवारात जवळपास 500 ते 700 लोकांचा समुह जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कराड बाजार समितीची 1986 साली बांधलेली संरक्षण भिंत पाडण्यासाठी हायकोर्टाने आदेश दिला होता. त्यानुसार गेल्या आठ दिवसापूर्वी तीन फूट भिंत हटवली होती. त्यानंतर कराड शहरातील त्रिशंकू भागातील नागरिकांनी तीन फूट ऐवजी 40 फूट भिंत हटविण्यासाठी कराड पालिकेत आंदोलन केले आहे. तर दुसरीकडे संरक्षण भिंत हटविण्याच्या आदेशा विरोधात बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी गेल्या 4 दिवसापासून बेमुदत संप पुकारला आहे. अशातच आता पालिका प्रशासनाने 20 फूट भिंत हटविण्याचा निर्णय घेतल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी सबापती विजयकुमार कदम, उपसभापती संभाजी चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, प्रा. धनाजी काटकर, संचालक नितीन ढापरे यांच्यासह बाजार समितीचे संचालक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी आदेश नसल्याने वादावादी
कराड बाजार समितीची भिंत हटविण्यासाठी आलेल्या पालिका प्रशासनाकडे कोणताही लेखी आदेश नसल्याने वादावादी सुरू झाली होती. पालिका मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी आपल्याला जिल्हाधिकारी यांनी तोंडी आदेश दिला असून लेखी आदेशाची गरज नसल्याचे म्हणत कारवाई करत असल्याचे सांगितले. तर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून जोपर्यंत लेखी आदेश देत नाही. तोपर्यंत आम्ही भिंत हटवून देणार नाही. तसेच पालिका प्रशासन राजकीय दबावाखाली चुकीची काम करत असल्याचा आरोप प्रा. धनाजी काटकर यांनी केला आहे. तसेच पालिका जबरदस्तीने कारवाई करत असल्याचा आरोप उपस्थितांनी करत संरक्षण भिंतीजवळ ठिय्या मांडला आहे.