कराड बाजार समिती निवडणूक : अर्ज छाननीत 3 अर्ज बाद, 73 वैध
कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीसाठी 18 जागांसाठी तब्बल 80 अर्ज दाखल झाले होते. मात्र आज अर्ज छाननीवेळी 3 अर्ज अवैध तर दुबार अर्ज भरलेले चार असे 7 अर्ज वगळता 73 अर्ज वैध असल्याची माहिती निबंध संदीप जाधव यांनी दिली.
आज झालेल्या अर्ज छाननीत सुनिल प्रकाश पाटील यांचा संस्था मतदार संघ व ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटातून दोन्ही अर्ज बाद झाले तर ग्रामपंचायत मतदार संघ अनुसूचित जाती – जमाती प्रवर्गातून दादा निवृत्ती कांबळे यांचा अर्ज बाद झाला. कराड शेती उत्पन्न बाजार समितीसाठी संस्था मतदार संघ सर्वसाधारण गटात 30, महिला प्रवर्गातून- 7, इतर मागास प्रवर्ग- 6, वि. जा. भ. ज गटातून- 4, असे दाखल केलेल्या 52 अर्जापैकी 47 अर्ज वैध ठरले आहेत.
व्यापारी अडते मतदार संघातून 4 अर्ज वैध तर हमाल- मापाडी मतदारसंघात एकच अर्ज दाखल असून तो वैध ठरला असल्याने बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे. एकूण 18 जागांसाठी 73 अर्ज वैध ठरले आहेत. आता अर्ज माघारीकडे लक्ष लागले असून अंतिम उमेदवारी कोणाला मिळणार याचे चित्र 20 तारखेला स्पष्ट होणार आहे. आता अर्ज माघारी घेण्यासाठी ही अनेकांचे मनधरणी करण्याचे प्रयत्न आता सुरू होतील.