कराड बाजार समिती निवडणूक : काका- बाबा गटाची एक जागा बिनविरोध
कराड| कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) व युवा नेते ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या गटाची एक जागा बिनविरोध निवडून आली आहे. हमाल -मापाडी गटातून वसंतगड गावचे गणपत आबासो पाटील असे बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांचे नांव आहे.
कराड शेती उत्पन्न बाजार समितीसाठी आज सोमवारी दिनांक 3 रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली. बाजार समितीची निवडणूक अत्यंत चर्चेची होणार असून यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व ॲड. उदयसिंह पाटील -उंडाळकर यांना कराड उत्तर येथील भाजपचे नेते मनोज घोरपडे, धैर्यशील कदम यांनी उपस्थित रहात, साथ दिली आहे. तर माजी सहकार मंत्री व कराड उत्तरचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील व भाजपचे प्रदेश कार्यकारणी सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे बंधू जयंत काका पाटील यांनीही सोसायटी गटातून अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ होती. यादरम्यान, हमाल व मापाडी गटातून सत्ताधारी काका- बाबा गटातून एकमेव गणपत आबासो पाटील यांचा अर्ज आल्याने ते बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची माहिती काका- बाबा गटाकडून देण्यात आली आहे.