कराड बाजार समिती रणधुमाळी : इच्छुकांनो अर्ज भरा पण माघारीच्या तयारीने, नेत्यांचे आदेश
हॅलो न्यूज | विशाल वामनराव पाटील
कराड शेती उत्पन्न बाजार समितीसाठी उद्या (दि.3) सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुकांची अर्ज दाखल करण्यासाठी भाऊगर्दी होणार आहे, त्या अगोदर रविवारी कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील आणि डाॅ. अतुल भोसले यांच्या इच्छुक समर्थकांकडून उमेदवारी मिळावी, म्हणून नेत्याच्या भेटीगाठी घेतल्याचे पहायला मिळाले. तर काही ठिकाणी समर्थकांच्या जोर- बैठकाही पहायला मिळाल्या. सत्ताधारी काॅंग्रेसचा काका- बाबा गटाकडून अर्ज दाखल करण्यात आले असून आता आ. पाटील आणि डाॅ. भोसले गटाकडून उद्या मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. यासाठी कोणतेही शक्ती प्रदर्शन केले जाणार नसून इच्छुकांनी अर्ज दाखल करावेत, परंतु माघारीची तयारी ठेवूनच असा सल्ला सध्या नेत्यांच्याच्याकडून इच्छुक उमेदवारांना दिला जात आहे.
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीपासून विकास सेवा सोसायटीचे राजकारण अन् आता कराड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात चर्चेची ठरणारी असणार आहे. त्यामुळेच काॅंग्रेस विरूध्द भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित दिसणार आहे. परंतु डाॅ. अतुल भोसले आणि आ. बाळासाहेब पाटील यांच्यापुढे इच्छुकांना थोपवण्याचा मोठा प्रश्न उभा असणार आहे. त्यामुळे सोमवारी अर्ज दाखल करा, परंतु माघारीची तयारी ठेवूनच असा सल्ला नेत्याकडून दिला जात आहे. आ. पाटील, भोसले गटात जागांचे वाटप ठरले असले तरी ते त्यांनी जाहीर केले नाही. राजकीय जाणकरांच्या मते, भोसले गटाला 5 ते 6 जागा मिळतील. तर माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांनाही 1 किंवा 2 जागा दिली जाणार आहे. आ. बाळासाहेब पाटील हे कराड उत्तर आणि कराड दक्षिणमधील काही भागात आपले उमेदवार देणार आहेत. उर्वरित 8 ते 10 जागा साहजिकच आ. बाळासाहेब पाटील यांच्या गटाला मिळण्याची शक्यता आहे.
कराड बाजार समितीत गेल्या दोन निवडणुकात सत्तांतर झाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे आता पुन्हा सत्तांतर करण्याचा इरादा घेवून विरोधक उमेदवार ठरविण्याचे काम करत आहेत. तर सत्ताधारी काका गटाकडूनही बाबा गटाला विचारात घेवूनच उमेदवारी ठरवली जात आहे. कराड शेती उत्पन्न बाजार समितीसाठी आतापर्यंत 24 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी डाॅ. अतुल भोसले यांच्या गटाकडून 6 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता सोमवारी माजी आ. आनंदराव पाटील यांच्याकडून त्याचे सुपुत्र मानसिंग पाटील हे ग्रामपंचायत गटातून अर्ज दाखल करतील. त्यासोबत आ. बाळासाहेब पाटील यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केले जातील. अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी मोठी रणधुमाळी दिसून येणार आहे. आ. पाटील यांच्या कार्यालयात रविवारी सकाळपासूनच इच्छुकांची गर्दी दिसून आली.