उंडाळे, तांबवेतील गणेश मंडळाला गणराया अवॉर्ड
कराड तालुका गणराया अवॉर्डचे वितरण

कराड:-कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळांना सन 2024 मधील गणराया अवॉर्डचे वितरण पार पडले. कराड तालुक्यात उंडाळे येथील आझाद गणेश मंडळाने प्रथम तर हनुमान गणेश मंडळ तांबवे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
गणराया अवॉर्ड स्पर्धेत जय महाराष्ट्र गणेश मंडळ येवती यांनी तृतीय तर जय शिवराय गणेश मंडळ रेठरे बुद्रुक यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. विशेष पारितोषिक एकता महिला गणेश मंडळ संजयनगर शेरे या मंडळाचा गौरव करण्यात आला.
गणराया अवॉर्ड स्पर्धेचे बक्षीस वितरण कराड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, उंब्रजचे एपीआय रविंद्र भोरे, ताई तळबीडचे एपीआय राजेश भोसले, कराड वाहतूक शाखेचे प्रभारी संदीप सूर्यवंशी यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमोल ठाकूर म्हणाले, गणेश मंडळांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपावी. आज समाज उपयोगी उपक्रम राबवणाऱ्या गणेश मंडळ यांचा तालुकास्तरावर गौरव होत आहे.
राजू ताशिलदार म्हणाले, गणेशोत्सव सण हा आपल्या सर्वांचा असून सर्वांनी गुण्यागोविंदाने साजरा करावा. उत्सवाला गालबोट लागेल असा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. तरुणांनी आपल्यासमोर आपल्या करिअर आहे. याचे भान ठेवून कोणताही कायदा सुव्यवस्था बिघडेल असे वर्तन करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.