KARAD : मायलेकी आखाडीला गेल्या अन् चिमुकलीवर अत्याचार

कराड :- तालुक्यातील एका गावात साडेचार वर्षीय अल्पवयीन मुलीवर अठरा वर्षीय युवकाने अत्याचार केला. याप्रकरणी संबंधित युवकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात पीडित मुलगी कुटुंबासह राहण्यास आहे. या कुटुंबाच्या घराशेजारी राहणार्या महिलेच्या घरी मंगळवारी रात्री आखाडी जेवणाचा कार्यक्रम होता. त्याठिकाणी मदत करण्यासाठी पीडित मुलगी गेली होती. संबंधित घरातील महिला स्वयंपाक करण्यात व्यस्त असताना मुलगी खेळण्यासाठी बाहेर रस्त्यावर आली. त्यावेळी पीडितेच्या शेजारी राहणार्या युवकाने मुलीला आपल्या सोबत घरी नेले. त्याठिकाणी त्याने मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार पीडित मुलीच्या घरी समजल्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्यासह पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने संशयीतावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले आहे. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे तपास करीत आहेत.



