Karad News : देहव्यापार प्रकरणात महिलेसह दोघांना अटक, पोलिस कोठडी
कराड तालुक्यात खळबळ

कराड | देहव्यापार करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका अनाथाश्रम चालक महिलेसह दोघांविरोधात कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर केले असता 23 आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली.
वाल्मिक महादेव माने (रा. म्हासोली, ता. कराड) याच्यासह आश्रम चालविणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केले आहे.
पोलिसांनी सांगीतले की, एका महिलेस जबरदस्तीने परपुरूषांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याबाबतची माहिती पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर व पोलीस निरिक्षक महेंद्र जगताप यांना मिळाली होती. तसेच लोणंद परिसरातील संबंधित महिला सातारा येथे आल्याचे समजल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे एक पथक साताºयाला रवाना झाले. संबंधित महिलेस ग्रामीण पोलिसांनी कराडला आणल्यानंतर तिच्या सांगण्यावरुन तक्रार दाखल करण्यात आली. पिडीत महिलेची एक वर्षापुर्वी कराड तालुक्यातील टेंभू येथे अनाथाश्रम चालविणाऱ्या महिलेशी ओळख झाली होती. त्यानंतर संशयित महिलेने पिडीत महिलेला पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत देहव्यापार करण्यास प्रवृत्त केले. तसेच तिने आर्थिक प्राप्ती केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याकामी संशयित महिलेस वाल्मिक महादेव माने हा मदत करत होता. तसेच त्यानेही पिडीत महिलेवर अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोेलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली आहे. तसेच याप्रकरणी आणखी काही संशयितांचा सहभाग आहे का, याबाबतचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली.
आश्रमाबाबात पोलिस काय म्हणाले…
टेंभू परिसरातील अनाथ आश्रमाच्या नावावर महिलांना ठेवून देहविक्री करण्यास भाग पाडत लोकांकडून पैसे स्विकारले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरिक्षक महेंद्र जगताप यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर एक वृद्ध महिला तिच्या नातीसह दहा वर्षांपासून तेथे राहत असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याठिकाणी इतर कोणीही महिला, मुली राहत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी वृद्ध महिलेसह तिच्या नातीला शासकीय संस्थेत पाठविले आहे.



