Satara News : कनेक्शन नाय, वापर नाय अन् शेतकऱ्याला 9 हजार 850 रूपयांचे वीज बिल
-विशाल वामनराव पाटील
वीज महावितरण कंपनीचा भोंगळ कारभाराचा अनेकदा अनुभव येत असतो, आता तर चक्क कनेक्शन नाही, वीज वापर नाही तरीही शेतक-यास 9 हजार 850 रुपयांच बिल देण्यात आले आहे. यामुळे शेतकरी कुटुंबास माेठा धक्का बसला आहे. एवढ्याच हा प्रकार न थांबता वीज वितरणचे अधिकारी हे बिल भरावेच लागेल असे सांगत आहेत.
नांदगाव (ता. कराड) येथील शेतकरी महादेव पाटील यांनी साडे सात एचपी पाण्याच्या पंपासाठी वीज कनेक्शन मिळावा म्हणून विद्युत कंपनीकडे अर्ज केला होता. त्यानंतर कनेक्शनसाठी डिपाॅझिट रक्कमही भरली. आजपर्यंत कनेक्शन जोडले नाही. गेले वर्षभर महादेव पाटील हे वीज कनेक्शनची वाट पहात आहेत. अशावेळी कनेक्शन आले नाही. मात्र, वीज बिल हाती आले.
आजपर्यंत वीज कनेक्शन न मिळालेल्या पाटील यांच्या थेट वीजबिलच हातात पडले. तेही तब्बल 9 हजार आठशे पन्नास रुपयांचे. हे बिल पाहून पाटील यांच्या कुटुंबास धक्का बसला. कनेक्शन नाही, वीज वापर नाही. तरीही बिल पाठविल्याने त्यांनी महावितरण कार्यालयाच्या विरोधात ग्राहक न्यायालयात दाद मागणार असल्याचे महादेव पाटील यांच्या बंधूनी सांगितले.