Karad Police : गहाळ झालेले, चोरीस गेलेले मोबाईल मालकांना मिळाले परत
कराड | येथील शहर पोलिसांनी गहाळ झालेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून ते त्यांच्या मुळ मालकाला परत केले. शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने सायबर पोलिसांच्या मदतीने याबाबतची कार्यवाही केली. कराड शहर परिसरातून गत वर्षभरात गहाळ झालेले तसेच चोरीस गेलेले मोबाईल शोधून ते त्याच्या मुळ मालकांना परत करण्यात आले.
पोलीस अधिक्षक समीर शेख, पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांना सूचना दिल्या होत्या. त्याबाबत त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल संग्राम पाटील यांना सुचना केल्यानंतर गहाळ झालेले, चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यासाठी सायबर पोलीस ठाण्याची मदत घेण्यात आली. तांत्रीक तपासाच्या आधारे शोध मोहिम राबवून पोलिसांनी मोबाईल शोधले.
सातारा, कोल्हापूर, कर्नाटकमध्ये हे मोबाईल वापरात असल्याची माहिती उपलब्ध झाल्यानंतर हवालदार विजय मुळे, हवालदार सुनील पन्हाळे, अमोल साळुंखे, कुंभार, किशोर तारळकर, दिग्वीजय सांडगे, अमोल देशमुख, मुकेश मोरे यांच्या पथकाने संबंधित मोबाईल त्या-त्या भागातून हस्तगत केले. त्यानंतर रविवारी संबंधित मोबाईलच्या मालकांना कागदोपत्री ओळख पटवून ते मोबाईल त्यांना परत देण्यात आले. हरवलेले तसेच चोरीस गेलेले मोबाईल परत मिळतील, अशी अपेक्षा नसतानाही पोलीस कॉन्स्टेबल संग्राम पाटील यांनी तांत्रीक तपास करीत मोबाईल परत मिळवून दिल्यामुळे संबंधितांनी समाधान व्यक्त केले.