पेट्रोल पंपावरील दरोड्यातील कटात कामगार सहभागी
कराड पोलिसांकडून दरोडेचा बनाव उघकीस, चौघांना अटक

कराड ः – पुणे- बेंगलोर महामार्गावर असलेल्या वाठार येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या चौघांना कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. पेट्रोल पंपावरील कामगारच या दरोड्यामध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. तर दोघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. तर एकजण विधीसंघर्ष बालक आले. पोलिसांनी संशयितांकडून चोरीस गेलेली रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चार मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यातील तिघांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रोहीत उर्फ दाद्या सुदाम कदम (रा. सांगली), किशोर चव्हाण व परशुराम दुपटे दोघेही (रा. आटके, ता. कराड) अशी त्यांची नावे असल्याची माहिती कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली. ते कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, डीवायएसपी अमोल ठाकूर व पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन येळवे, पोलीस हवालदार सचिन निकम, उत्तम कोळी, विनोद माने, किरण बामणे, रविंद्र देशमुख, प्रफुल्ल गाडे, मोहित गुरव यांनी केली.