Karad जुन्या भांडणातून एकावर कोयत्याने वार : शहर पोलिसात 7 जणांवर गुन्हा
कराड । जुन्या भांडणाच्या कारणावरून लाकडी दांडक्याने मारहाण करत कोयत्याने वार केल्या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एक जण अल्पवयीन असून पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. यात एक जण गंभीर जखमी असून वारुंजी (ता. कराड) येथील सह्याद्री हॉस्पिटल समोर रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
अजय विजय सावंत (वय- 23, रा. शनिवार पेठ, कराड) असे जखमीचे नाव आहे. तर जखमी अजय सावंत याने दिलेल्या फिर्यादीवरून शशांक जालिंदर होगाडे (वय- 29), रोहित मारुती होगाडे (वय- 30), आकाश राजू वाघमारे (वय – 22), शुभम गोपाळ साळुंखे (वय- 21), विनायक विवेकानंद होगाडे (वय- 30, सर्व रा. शनिवार पेठ, कराड), यासर उर्फ सोन्या कादर शिकलगार (वय- 22, रा. मलकापूर, कराड) यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वारुंजी येथील सह्याद्री हॉस्पिटल समोर जुन्या भांडणाच्या कारणावरून संशयित हातात कोयता व लाकडी दांडके घेऊन मोटरसायकलवरून आले. तेथे त्यांनी फिर्यादीला थांबवून शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी शशी होगाडे याने अविनाश कांबळे याच्या कानाखाली मारून ‘यांना लय मस्ती आली आहे, मारा यांना असे सांगितले. त्यामुळे विनायक होगाडे, सोन्या शिकलगार, शुभम साळुंखे, अक्षय वाघमारे व अल्पवयीन मुलाने दांडक्याने अविनाश यास मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अजय सावंत सोडवण्यास गेला असता शशी होगाडे व रोहित होगाडे यांनी कोयत्याने सावंत यांच्या डोक्यात, पायावर खांद्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयतांना अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पी. एस. जाधव करत आहेत.