मंत्रीपदाच्या कारकिर्दीत कराड उत्तरचे आमदार अपयशी : विक्रांत पाटील
मसूर प्रतिनिधी । गजानन गिरी
कराड उत्तरच्या आमदारांना कॅबिनेट मंत्रीपद असताना मोठ्या प्रकल्पासह औद्योगिककरण करता आले नाही. दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्यातच त्यांचा हातखंडा आहे. अशी टीका भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी मसूर ता कराड येथे रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटकरण भूमिपूजन प्रसंगी बोलताना केली. आता कराड उत्तरच्या विकासाची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. विकासासाठी दोनशे कोटी पर्यंतच्या निधीची तरतूद करत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजप महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य तथा लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ, कराड उत्तर युवानेते मनोजदादा घोरपडे, युवा मोर्चा सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, माजी जि. प. सदस्य सागर शिवदास, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, भाजपा जिल्हा सचिव दिपाली खोत, तालुकाध्यक्ष शंकरराव शेजवळ, मसूर ग्रा.पं. सदस्य संजय शिरतोडे, सुनील दळवी, कराड उत्तर समन्वयक महेश जाधव, जयवंतराव जगदाळे, वैशाली मांढरे, बिपिन जगदाळे, प्रल्हाद जगदाळे, नवीन जगदाळे, राजेंद्र लोहार, अतुल जगदाळे, प्रज्योत कदम,अक्षय बर्गे उपस्थित होते. विक्रांत पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत, किसान सन्मान योजना, पंतप्रधान आवास योजना यासह अन्य योजना प्रत्यक्षात साकारल्या आहेत. त्या कार्यरत असल्याने जनतेला त्याचा चांगला लाभ मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगन्मान्य नेतृत्व आहे. त्यांनी आपला देश जागतिक पातळीवर नेला आहे. विकासाच्या जोरावर केंद्रात नरेंद्र मोदी राज्यात देवेंद्र फडणवीस असे समीकरण पाहावयास मिळणार आहे. कराड उत्तरमध्ये विकास काय असतो ते यापुढे दिसणार आहे.
धैर्यशील कदम म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत विद्यमान आमदारांनी धनगरवाडी हणबरवाडी पाणी योजनेचा डंका वाजवला. मात्र पाणी आल्यानंतर बटन दाबायला पळाले. पाणी कोणी आणले याचे उत्तर आमदारांना जनतेला द्यावे लागेल. पोकळ गप्पा मारणारे म्हणून आमच्यावर टीका होते. पण विकास राबवणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. शिवडे ते शामगाव घाट रस्ता, मसूर-शिरवडेफाटा रस्ता यासह अनेक कोट्यवधीची कामे सुरू आहेत. कराड उत्तरच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत.विकास कामांचा खोटा पुळका आणणाऱ्यांनी हे पहावे.
रामकृष्ण वेताळ म्हणाले, मसूरच्या शितोळे वस्तीत 25 वर्षे वीज नव्हती. ती आम्ही 25 घरांना दिली. मात्र विरोधकांनी लाईटबिले हातात धरून आम्हीच वीज आणल्याचा पोकळ दावा केला. हे आता फारकाळ टिकणार नाही. अजूनही मसूरमध्ये आणखी विकासकामे राबवणार आहोत. तेव्हा विकास काय व कसा असतो हे कळेल.
मनोजदादा घोरपडे म्हणाले, विकास कामे न करता नारळ फोडण्याचे काम उत्तरमध्ये चालू आहे. फुकटचा श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आगामी निवडणुकात भाजपचे मोठे व सक्रिय नेटवर्क राहणार आहे. भाजप सर्व निवडणुका ताकतीने लढविणार आहे. कराड उत्तर हा भाजपचाच असेल. ॲड. उदयसिंह जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. भाजपच्या जिल्हा सचिव दिपाली खोत यांनी सूत्रसंचालन केले. सुमित शहा यांनी आभार मानले.
भाजपमध्ये अनेकांचा जाहीर प्रवेश…..
रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी मसूरच्या ग्रा.पं. सदस्या सौ. पूजा साळुंखे, दत्तात्रय वसंत माने, जोतीराम भांडवले, हणबरवाडीचे रघुनाथ शेडगे, कराड उत्तर लोहार संघटनेचे बापूसाहेब लोहार, बेलदार भटके महासंघाचे अध्यक्ष रवींद्र मोहिते, महाराष्ट्र राज्य संस्थापक संदीप गुजले यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.