कराड येथील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आत्महत्या : कारण अस्पष्ट

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
कराड येथे एका महाविद्यालयात शिकत असलेल्या युवकाने अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित मृत युवक सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील शिरशी या गावातील राहणारा आहे. श्रीराज मानसिंग पाटील (वय- 17) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, श्रीराज पाटील हा कराड येथील एका कॉलेजमध्ये बी.फार्मसीचे शिक्षण घेत होता. शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या पथकाने दरीत उतरून त्याचा मृतदेह दरीतून वर काढला आहे. कराड येथील महाविद्यालयातून बाहेर गेला होता. यावेळी त्याच्या पालकांशी संपर्क साधला असता तो घरी गेला नव्हता. रात्री त्याने अजिंक्यतारा किल्ल्यावर जावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मोबाईल लोकेशनमुळे त्याचा पोलिसांना ठिकाण आढळून आले.
जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्याने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही. याबाबत सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. सदरील युवकाची अपहरण झाल्याची फिर्याद त्याच्या पालकांनी कराड शहर पोलिस ठाण्यात नोंदवली होती.