कराडला पुस्तकांची बाग : उद्यापासून मुलांना मिळणार मोफत वाचायला पुस्तके
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात भिलार हे पुस्तकाच गाव म्हणून परिचित आहे. आता माजी नगरसेवक सौरभ पाटील, वाचन प्रेमी आणि नगरपालिका यांच्या संकल्पनेतून कराडला पुस्तकांची बाग ही संकल्पना उभारली गेली आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण वाचन चळवळ सुरू केली होती. आता उन्हाळी सुट्यांमध्ये यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनाच्या आवारातील मोकळ्या जागेचा वापर करत त्या ठिकाणी पुस्तकांची बाग साकारली असून मुलांना मोफत वाचनाची सोय केल्याची माहिती सौरभ पाटील यांनी दिली.
स्व. यशवंतराव चव्हाण वाचन चळवळीस मोठा प्रतिसाद मिळाला असून या उपक्रमांस विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी सुमारे अडीच हजार मुलामुलींनी या चळवळीत नोंदणी केली आहे. कराड पालिकेच्या सहकार्याने यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनच्या (टाऊन हाॅल) येथे पुस्तकांची बाग साकारली आहे. या जागेतील गवत काढून तेथे मुलांना बसण्यासाठी कट्टे बांधण्यात आले असून आकर्षक रंगरंगोटी केली आहे. येथील झाडांवर वाचनालयातील बालसाहित्याचे फोटो लावले आहेत. आकर्षक चित्रेही ठेवण्यात आली आहे. मुलांना रमणीय परिसर व्हावा, यासाठी राहुल पुरोहित यांचे मार्गदर्शन केले आहे.
उन्हाळी सुट्टीत दि. 5 मे ते 15 जून कालावधीत येथे पुस्तकांची बाग उपक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आपले ओळखपत्र घेऊन नगरवाचनालयात द्यावे. तेथून आवडते पुस्तक घेऊन पुस्तकांच्या बागेत सकाळी 8 ते 10 या वेळेत वाचावे. जाताना पुस्तक परत देऊन ओळखपत्र घेऊन जावे, अशी संकल्पना आहे. उद्या (गुरुवारी) सायंकाळी पाच वाजता कन्हाड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे.