कराडला सरपंच पदासाठी 53, सदस्य पदासाठी 323 अर्ज : रेठरे बुद्रुक, टेंभूला चुरस
टेंभू सरपंचपदासाठी वर्षाराणी सयाजी पाटील यांचा अर्ज दाखल
कराड | तालुक्यातील निवडणुक लागलेल्या 16 ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी 53 आणि ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी 323 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. टेंभू येथे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण असल्यामुळे तेथे अटीतटीची लढत पहावयास मिळणार आहे. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ज्योतिर्लिंग पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी पॅनेल प्रमुख बब्रुवान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल केले. यामध्ये सरपंचपदासाठी कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालिका वर्षाराणी सयाजी पाटील यांचा अर्ज दाखल केला गेला. यावेळी टेंभूतील ग्रामस्थांनी मोठ्या शक्तीप्रदर्शन करत त्यांचा अर्ज दाखल केला.
दरम्यान करंजोशी, सावरघर, यशवंतनगर, डिचोली या ग्रामपंचायती बिनविरोध होणार आहेत. शेळकेवाडी (येवती) येथील सरपंचपद पदासाठी एकच अर्ज आला आहे. त्यामुळे ती जागा बिनविरोध झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी करंजोशी सावरघर, यशवंतनगर, डिचोली या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर उर्वरीत भोसलेवाडीत सरपंच पदासाठी तीन, सदस्य 21, बानुगडेवाडी सरपंच चार, सदस्य 14, गोसावेवाडी सरपंच दोन, सदस्य 12, हेळगाव सरपंच सहा, सदस्या 19, कांबीरवाडी सरपंच तीन, सदस्य 18, पिंपरी सरपंच दोन, सदस्य 10, शेळकेवाडी सरपंच एक, सदस्य 10, येणपे सरपंच तीन, सदस्य 29, येवती सरपंच तीन, सदस्य 24, रेठरे बुद्रुक सरपंच 15, सदस्य पदासाठी सर्वात जास्त अर्ज 92 दाखल झाले आहेत तर सयापूर सरपंच दोन, सदस्य पाच, टेंभू सरपंच पाच, सदस्य 34 अर्ज दाखल झाले आहेत. आजअखेर सरपंच पदासाठी 53 तर सदस्य पदासाठी 323 उमेदवारी अर्ज दाखल झाले.
वाठार, शहापूर, लोहारवाडी, चिंचणी, भांबे, डेळेवाडी, धावरवाडी, आंबवडे, हवेलवाडी या ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक लागली होती. त्यामध्ये फक्त वाठार येथे दोन तर शहापूर येथे एक उमेदवारी अर्ज दाखल झाला. उर्वरित सात ग्रामपंचायतीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.