‘कराडचा नवा पूल जीवघेणा’ (भाग-1) : वाहतूक कोंडीने वाहन चालकांसह कराडकर वैतागले
– विशाल वामनराव पाटील
कराड शहराच्या कोल्हापूर नाक्यावर नवा उड्डाणपूल उभारण्याचे काम गेल्या 5 महिन्यापासून सुरू झाले असून वाहन चालकांना, स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पुलाचे काम सुरू झाल्यापासून वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला आहेच. परंतु गेल्या पाच महिन्यात झालेल्या अपघातात काही लोकांचाही बळी गेला आहे. या पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी किरकोळ अपघात ही संकल्पना दररोजच नव्हे, तरी काही तासा- तासाला पहायला मिळत आहे. अशावेळी प्रशासन आणि संबधित विभाग काय करत आले, याचा आढावा घेणारी ‘कराडचा नवा पूल जीवघेणा’ ही मालिका आजपासून ”हॅलो न्यूज” मध्ये वाचा (भाग एक- वाहतूक कोंडी)
कराड व मलकापूर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या लोकांसाठी हा 6 पदरी उड्डाणपूल वाहनांसाठी व प्रवाशांसाठी एक स्वप्नवत असणार आहे. राज्यातील महामार्गावरील हा पहिलाच 3. 2 किलोमीटर लांब हा पूल असणार आहे. त्यामुळे साहजिकच जेव्हा अजून 20 महिन्यांनी हा उड्डाणपूल उभारला जाईल, तेव्हा वाहनांना व प्रवाशांना वाहतूक कोंडीतून सुटका देणार ठरणार आहे. परंतु तोपर्यंत गेल्या 5 महिन्यापासून अनुभवत असलेली वाहतूक कोंडी अजून पुढे 20 महिने कराडकर नागरिकांना अनुभवावी लागणार आहे. अवघे 100 ते 200 मीटर अंतर जायचे असेल तर या कामामुळे 1 हजार ते 2 हजार मीटर वळसा घालून यावे लागत आहे. तरीही कराडकर त्रास सहन करत आहेत, परंतु अशावेळी संबधित असलेली डीपी जैन कंपनीने काय उपाय योजना केल्या आहेत का असा सवाल उपस्थित राहत आहे.
मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या परिक्षेच्या काळात कराडकरांना पुणे- मुंबईच्या ट्रॅफिकचा सामना करावा लागला. आजही या रस्त्यावर एखादे वाहन बंद पडल्यास 2 ते 3 तास ट्रॅफिकमध्ये अडकून रहावे लागत आहे. मग अशावेळी पर्यायी व्यवस्था किंवा कंपनीचे अधिकारी, कर्मचारी कुठे असतात, असा सवाल वाहन चालकांच्यातून तसेच सामान्य कराडकरांच्यातून उपस्थित केला जावू लागला आहे. कराडकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असताना त्यावर प्रशासन तसेच डीपी जैन कंपनीचे अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर नसतात. तेव्हा असे अधिकारी व कर्मचारी या वाहतूक कोंडीचा अभ्यास करून उपाययोजना करणार की केबिन मधूनच काम पाहणार असा सवाल उपस्थित राहतो.
(उद्याच्या भागात – डीपी जैन कंपनीचे 40 कर्मचारी गेले कुठे)