कराडची श्री रेफ्रिजिएशन लि. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कडून लिस्टेड

कराड :- कराड येथे 35 वर्षांपूर्वी एका छोट्याशा व्यवसायाची सुरुवात केली. कंपनीने अनेक चढ-उतार पहात, अनेक व्यवसाय, अनेक उत्पादने निर्माण केली. अनेक कंपन्यांसोबत काम करत अखेर आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कडून लिस्टेड होण्याचा मान कराड तालुक्यातील श्री रेफ्रिजिएशन लि. कंपनीला मिळाल्याची माहिती चेअरमन रवळनाथ शेंडे यांनी दिली.
साताऱ्यातील कराड तालुक्यात विरवडे- ओगलेवाडी येथे स्थानिक तरुणांना घेऊन रवळनाथ शेंडे यांनी एक छोटसं स्वप्न बघितलं. प्रायव्हेट कंपनी स्थापन केली, आता ती लिमिटेड कंपनी झाली आहे. प्रिंटिंग, इंडस्ट्रियल, चिलर, मिल्क, फार्मा, केमिकल अशा अनेक क्षेत्रात प्रवास करता करता कंपनी स्थानिक तरुणांच्या मदतीने मोठी झेप घेत आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या माध्यमातून कंपनीची वाटचाल सुरू आहे. कंपनीचा चढता आलेख पाहता श्री रेफ्रिजिएशन लिमिटेडला इंडियन नेव्हीसाठी योगदान देण्याची संधी मिळाली. त्यामध्ये कंपनीने आत्मविश्वासाने उच्च दर्जाचे योगदान दिले. यामध्ये इंडियन नेव्हीच्या युद्धनौका आणि पाबुड्यासाठी एअर कंडिशन सिस्टिम तयार करतात. कंपनी इंडियन नेव्ही आणि डिफेन्स साठी काम करत असल्याने अभिमान वाटत असल्याची भावना कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या आणि डायरेक्टरांच्यात दिसते. विरवडे- ओगलेवाडी त्यासोबत वाघेरी येथे कंपनीचं सध्या काम सुरू आहे. तर हणबरवाडी येथे नवीन विस्तार करण्याचा मानस असल्याचा चेअरमन रवळनाथ शेंडे यांनी बोलून दाखवला.
श्री रेफ्रिजिएशन लि. कंपनीच्या योगदानात रवळनाथ शेंडे यांना कुटुंबियांचा फार मोठा पाठिंबा मिळाला. यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या पत्नी डायरेक्टर राजश्री शेंडे यांनी मोठी जबाबदारी नेहमीच पेलली आहे. त्यासोबत कंपनीचा संचालक मंडळात उच्च पदस्थ व्यक्ती असल्याने नवनवीन संकल्पना राबवल्या जात आहेत. या संचालक मंडळाचा कंपनीला फार मोठा फायदा होत असून कंपनीच्या प्रवासात भूतकाळातील अनुभव, वर्तमान काळातील संधी यामुळे भविष्यकाळ हा सुवर्णकाळ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
कंपनी आणि कर्मचारी
कराड सारख्या छोट्या शहराजवळ असलेल्या विरवडे- ओगलेवाडी येथे श्री रेफ्रिजिएशन लिमिटेड कंपनी स्थानिक तरुणांना सोबत घेऊन जागतिक पातळीवरचे काम करत आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला योग्य साधनसामग्री, प्रशिक्षण, सेवा, सुविधा तसेच कामाचा योग्य मोबदलाही दिला जातो. एका छोट्याशा खेडेगावात सुरू असलेली ही कंपनी आज जागतिक पातळीवर आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत आहे.
श्री रेफ्रिजिएशन लिमिटेड कंपनीचा “लोकल ते ग्लोबल” प्रवास :- राजश्री शेंडे
कंपनीच्या डायरेक्टर राजश्री शेंडे यांना काही काळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा योग आला. कंपनीच्या कामाची पद्धत आणि काम थेट पंतप्रधानांना सांगितले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छोट्याशा गावात कसे काम करता असा प्रश्न विचारता राजश्री शेंडे यांनी आम्ही लोकल ते ग्लोबल असा प्रवास सुरू केला असल्याचे सांगितले. आज खरच ग्रामीण भागातील कराड सारख्या लोकल ठिकाणावरील स्थानिक मनुष्यबळ, साधनसामुग्री वापरून श्री रेफ्रिजिएशन लिमिटेड कंपनी भारत देशासह जागतिक (ग्लोबल) पातळीवर निर्मिती केलेल्या वस्तू पोहचवण्याचा मानस असल्याचे अभिमानाने डायरेक्टर राजश्री शेंडे सांगतात.