किवळला ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम : एक रुपयात पिक विमा योजनेत 250 शेतकऱ्यांचा सहभाग

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सामान्य जनतेच्या हिताचा शासन आपल्या दारी उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवला जात आहे. त्या अनुषंगाने किवळ (ता. कराड) येथे आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमास मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एक रुपयात पीक विमा योजनेत 250 शेतकऱ्यांनी सहभाग दर्शवला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात 25 लाभार्थ्यांनी अर्ज भरला. संजय गांधी योजनेसाठी 50 अर्ज भरून घेण्यात आले. मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष संपर्कप्रमुख शैलेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार विजय पवार, तालुका कृषी अधिकारी डी. ए. खरात, संजय गांधी निराधार योजनेचे बाजीराव पाटील, नायब तहसीलदार युवराज पाटील, भाजपच्या जिल्हा सचिव दिपाली खोत, बाजार समितीचे संचालक सतीश इंगवले, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी मानसिंग पवार, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक गणेश पाटील, नम्रता अमंदे, गडकरी, माजी पंचायत समिती सदस्या सुरेखा साळुंखे, कृष्णत चव्हाण, दिनकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते पवन निकम, माजी पंचायत समिती सदस्या सुरेखा साळुंखे, सेवा निवृत्त डीवायएसपी उत्तमराव साळुंखे, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष साळुंखे उपस्थित होते.
कार्यक्रमात अनेक शासकीय योजनेचे स्टॉल लावण्यात आले होते. एक रुपयामध्ये पिक विमा या योजनेमधून 250 शेतकऱ्यांनी विमा काढला. संजय गांधी निराधार योजनेसाठी 50 अर्ज भरून दिले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळामार्फत 25 लाभार्थ्यांनी अर्ज भरला. अन्नपुरवठा योजनेमधून रेशनकार्ड धारकांनी नाव कमी करून व नवीन नाव वाढवणे यासाठी 150 लोकांनी अर्ज भरून जागेवर लाभ घेतला. आरोग्य केंद्रामार्फत ब्लडप्रेशर, शुगरची 300 लोकांनी तपासणी केली. पोस्ट खात्याद्वारे आधारकार्ड लिंकिंग, नवीन पोस्ट खाते काढून देणे यासाठी 100 लाभार्थ्यांचे जागेवर खाते उघडण्यात आले.
ग्रामीण भागातील मसूर, चिखली, निगडी, रिसवड, अंतवडी, घोलपवाडी, किवळ या भागातील शेतकऱ्यांनी शासन आपल्या दारी या अभियान योजनेचा लाभ घेतला. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम प्रदीप साळुंखे मित्रपरिवाराने आयोजित करून सर्वसामान्यांपर्यंत सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी परिश्रम घेतले. समाजासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या भाजपच्या कामगार संघटनेच्या प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल दत्तात्रय साळुंखे यांचा व प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अमोल कारंडे यांची पाच टक्के निधी नियोजन समितीवर निवड झाली. त्या निमित्ताने त्यांचा प्रदिप साळुंखे मित्र परिवार व ग्रामस्था्च्यावतीने तहसीलदार विजय पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सौ. वैशाली बाबर यांनी प्रास्ताविक केले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. वैभव साळुंखे यांनी आभार मानले. सुधीर साळुंखे, राजेंद्र साळुंखे, सचिन साळुंखे, ऋषिकेश साळुंखे, श्रीकृष्ण साळुंखे, सुशांत पवार, पराग पवार, मंगेश शिंदे, अशिष साळुंखे ,ॠगवेद साळुंखे, अनिकेत साळुंखे उपस्थित होते.