कराडात पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर 3 ठिकाणी धाडसी चोरी
एअर गन व एअर पिस्टलवर चोरट्यांचा डल्ला

कराड | येथील तहसील कार्यालय, पोलिस निरीक्षक यांच्या निवासस्थान परिसरातील एका हॉटेलसह तीन ठिकाणी चोरी झाली आहे. एका घरातून एअर गन व एअर पिस्टलवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. त्याचबरोबर काही रोख रक्कमही चोरट्यांनी लंपास केली. कराड (Karad) शहरातील मुख्य ठिकाण व शासकीय यंत्रणेच्या निगरानीखाली असलेल्या परिसरात चोरी झाल्याने यांची दिवसभर चांगलीच चर्चा रंगली होती.

पोलिस उपअधीक्षक कार्यालय, तहसील कार्यालय आणि पोलिस निरीक्षक यांचे निवासस्थान हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पंचायत समिती परिसरातील स्वराज्य हॉटेल, स्वप्ननगरी कार्यालय आणि याच परिसरातील शिंदे यांच्या घरात चोरी झाली आहे. शिंदे यांच्या घरातून पिस्टल चोरीस गेले आहे. तर स्वप्ननगरी कार्यालयाच्या काचा फोडून रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. तर अन्य एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला आहे.

शहरातील एका प्रसार माध्यमाचे कार्यालय फोडून चोरट्यांनी सुमारे 50 हजारांचे साहित्यासह रोकड लंपास केली. शनिवार पेठेत पंचायत समितीनजीक घडलेली घटना आज उघडकीस आली. प्रकाश पिसाळ (रा. कार्वे, ता. कराड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पिसाळ यांचे शनिवार पेठेत पंचायत समितीनजीक कार्यालय आहे. दिवसभराचे काम आटोपल्यानंतर रात्री सातच्या सुमारास पिसाळ यांनी त्यांचे कार्यालय बंद केले. शनिवारी ते कार्यालयाकडे आले नाहीत. तर रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कार्यालयानजीक असलेल्या हॉटेल चालकाने त्यांना फोन करून चोरी झाल्याचे सांगितले. हवालदार सुनील पन्हाळे तपास करीत आहेत.



