कोयना धरणातून दुप्पट पाणी सोडणार : कोयना, कृष्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
– विशाल वामनराव पाटील
सातारा जिल्ह्याला आज आणि उद्या रेड अलर्ट दिला असून कोयना धरणात सध्या धरणात 62.41 टीएमसी पाणीसाठा आहे. पावासाचा जोर कायम असल्याने पाण्याचे नियोजन करण्यासाठी सध्या धरणातून 1 हजार 50 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असून त्यामध्ये वाढ करून दुप्पट 2100 क्युसेस पाणी नदीपात्रात उद्या दुपारी 4 वाजल्यापासून सोडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कोयना, कृष्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
कोयनेत 62. 41 टीएमसी पाणीसाठा…
कोयना धरणात बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 62. 41 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. आज दिवसात कोयनेला- 51 मिलीमीटर, नवजा- 60 मिलीमीटर व महाबळेश्वरला- 46 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयनेला- 2391, नवजा- 3334 आणि महाबळेश्वरला- 3149 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणात प्रतिसेंकद 42 हजार 669 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे.
जिल्ह्यात सरासरी 23.3 मि.मी. पाऊस
जिल्ह्यात सरासरी 23.3 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 350.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस एकूण सरासरीच्या 39.06 टक्के इतका आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सातारा – 28.1 (361.6), जावली-मेढा – 39.7(643.7), पाटण -32.0 (674.9), कराड – 14.0 (190.0), कोरेगाव – 17.3 (161.4), खटाव – वडूज – 9.2 ( 123.9), माण – दहिवडी -14.4 (112.8), फलटण – 11.9 (80.7), खंडाळा -13.4 (117.1), वाई -24.0 (270.0), महाबळेश्वर -85.0 (1849.6) या प्रमाणे पाऊस झाला आहे.