कृष्णा कारखाना सभा : डॉ. सुरेश भोसले यांना ‘पद्म’ पुरस्कार मिळावा!, आमदार बाळासाहेबांचे जाहीर आभार

कराड | कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी कृषी, सहकार, आरोग्य, शिक्षण अशा क्षेत्रात उत्तुंग कार्य केले आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात त्यांनी कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून सुमारे 9 हजारहून अधिक रुग्णांना जीवदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन, त्यांना मानाचा राष्ट्रीय ‘पद्म’ पुरस्कार प्रदान करण्यासाठी कारखान्याने सभासदांच्यावतीने केंद्र व राज्य सरकारकडे शिफारस करावी, अशा मागणीचा ठराव तांबवे (ता. वाळवा) येथील सभासद शिवाजीराव पाटील यांनी ऐनवेळच्या विषयात मांडला. त्याला अधिकराव पाटील यांनी अनुमोदन दिले. टाळ्यांच्या गजरात हा ठराव सभासदांनी मंजूर केला.
अमित शाहामुळे कृष्णा कारखान्यांचा 390 कोटीचा टॅक्स माफ : डॉ. सुरेश भोसले
केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी साखर कारखान्यांचा इन्कमटॅक्स कायमस्वरुपी माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन, साखर कारखानदारीला मोठा दिलासा दिला आहे. कृष्णा कारखान्याचा 390 कोटी रूपयांचा टॅक्स माफ झाला आहे. तसेच आतापर्यंत जो काही टॅक्स भरला तोही परत मिळणार आहे. तेव्हा सध्याचे सरकार हे शेतकऱ्यांचे आहे. गेल्या 70- 75 वर्षातील सरकारने काय केले असा प्रश्न निर्माण होतो. परंतु, मी अधिक बोलल्यास ते राजकीय वाटू शकते. तेव्हा आताच्या सरकारने शेतकऱ्याच्या हिताचा आणि कारखानदारी वाचवणारा निर्णय घेतल्याचे चेअरमन डाॅ. सुरेश भोसले यांनी सांगतिले.
आमदार बाळासाहेब पाटील यांचे आभार : डाॅ. अतुल भोसले
कृष्णा कारखान्याच्या विस्तारणीकरणाची NOC आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काही थोड्या परवानग्या राहिल्या होत्या, त्या दिल्या. आदरणीय बाळासाहेब पाटील सहकारमंत्री असताना आपण प्रस्ताव केला होता. त्याच्या काळात कारखाना विस्तारणीकरणाच्या अनेक बाबी पूर्ण झाल्या होत्या. आ. बाळासाहेब पाटील हे सहकारमंत्री असताना आम्ही संचालक मंडळासहीत भेटायला गेलो होतो. तेव्हा आम्ही म्हणालो, रामायण झाले ते झाले. स्व. पी. डी. पाटील, स्व. आप्पा, स्व. भाऊ यांच्यापासून सहकारात एकत्रित काम करण्याचे बरोबरीने ठेवूया. आम्ही जुनी आठवणीला उजाळा दिला. जेव्हा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याला ज्यावेळी परवानगी द्यायची होती, त्यावेळी स्व. आप्पांनी ना हरकत कृष्णा साखर कारखान्यांची दिली होती. आता सहकारमंत्री असताना आमदार बाळासाहेबांनी शासनाची जी मदत लागते, ती सगळी केली. तेव्हा सभासद आम्ही आमदार बाळासाहेब पाटील यांचे आभार मानतो.
कारखान्यात राजकीय संघर्ष नसली तरी एफआरपीपेक्षा जादा दर दिला : डॉ. अतुल भोसले
डॉ. सुरेशबाबांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने वर्षभरात जलदगतीने कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण केले आहे. यामुळे कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन १२ हजार मेट्रीक टनापर्यंत वाढणार आहे. या गळीत हंगामात प्रत्येक ठिकाणी दीडपट तोडणी यंत्रणा देण्याचा कारखान्याचा प्रयत्न असून, सभासद कल्याण हे एकमेव उद्दिष्ट ठेवून संचालक मंडळ काम करत आहे. कारखाना 15 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट समोर ठेवून काम करेल. कारखान्यांने यापूर्वी कायम राजकीय संघर्ष पाहिला आहे, आता संघर्ष नसला तरी एफआरपीपेक्षा जास्त दर दिला आहे. त्यामुळे कृष्णा कारखाना बळकट करण्यासाठी संचालक मंडळास सभासदांनी भरघोस सहकार्य करावे, असे आवाहन डाॅ. अतुल भोसले यांनी केले.
अतुलबाबांची काळाजीपूर्वक तत्परता
स्व. डाॅ. पतंगराव कदम याचे बंधू आ. मोहनराव कदम कृष्णा कारखान्याच्या सभेला स्टेजवर डाॅ. सुरेश भोसले आणि डाॅ. अतुल भोसले यांच्या मध्ये बसलेले होते. यावेळी आ. मोहनराव कदम यांना वयोमानामुळे जास्त काळ खाली बसता येत नसल्याचे डाॅ. अतुल भोसले यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्परता दाखवत खुर्ची आणायला सांगत, आ. कदम यांना खुर्चीवर बसवले.
ठराव मंजूर का?
कृष्णा कारखाना सभेत सर्व 11 विषयांचे सूचक व अनुमोदक एका पाठोपाठ एक उभे होते. तर ऐनवेळेचे 3 विषय असे सर्व ठराव अवघ्या अर्ध्या तासात मांडण्यात आले. यावेळी उपस्थित सभासदांना चेअरमन डाॅ. सुरेश भोसले हे ठराव मंजूर का म्हणताच… मंजूर असा सूर येत होता. ऐनवेळेच्या विषयात डाॅ. सुरेश भोसले पद्म पुरस्कार, स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांची जन्मशताब्दी साजरी करणे आणि सभासदांना आरोग्य विषय सवलती देण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.