कृष्णा कारखान्याची साखर सभासदांना मोफत व घरपोच : आजपासून कुठे आणि कधी मिळणार पहा
कराड | यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने सभासदांना देण्यात येणाऱ्या मोफत घरपोच साखर वितरणाचा प्रारंभ करण्यात आला. कारखाना कार्यस्थळावर मान्यवरांच्या हस्ते साखर पोत्यांच्या वाहनांचे पूजन करण्यात आले. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने चेअरमन डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी प्रत्येक सभासदास दिली जाणारी प्रतिशेअर ६० किलो मोफत साखर घरपोच देण्याचे अभिवचन दिले होते. या अभिवचनाची वचनपूर्ती दरवर्षी कारखाना करत आहे. यंदाही या मोफत घरपोच साखर वितरणाचा प्रारंभ करण्यात आला आहे.
पहिल्या दिवशी कारखाना कार्यक्षेत्रातील कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक, वाळवा तालुक्यातील इस्लामपूर, तर कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे या गावात सभासदांना साखर वितरण करण्यात आले. कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावांमध्ये नियोजनानुसार मोफत घरपोच साखर वितरित केली जात आहे. प्रारंभी कारखाना कार्यस्थळावर उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक बाजीराव निकम, विलास भंडारे, कार्यकारी संचालक राम पाटील, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, माजी संचालक पांडुरंग होनमाने, सेक्रेटरी मुकेश पवार व सर्व अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत साखर पोत्यांच्या वाहनांचे पूजन करून वाहने रवाना करण्यात आली.
कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक गावामध्ये सोसायटीचे अध्यक्ष व्ही.के. मोहिते, माजी प.स सदस्य संजय पवार यांच्या हस्ते सभासदांना साखर पोत्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी पांडुरंग साळुंखे, गजानन कुलकर्णी, मनोहर कुलकर्णी आदी उपस्थित होते.