डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णा महोत्सव आजपासून
होम मिनिस्टर, मॅरेथॉन, शरीर सौष्ठव स्पर्धा, खेळ पैठणीचा आदींचा समावेश
कराड | विशाल वामनराव पाटील
भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांचा वाढदिवस मंगळवार (दि. 28 रोजी) विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्तच तीन दिवसीय कृष्णा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 31 मार्च ते 3 एप्रिल यादरम्यान होणाऱ्या या तीन दिवसीय महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. अतुलबाबा भोसले वाढदिवस संयोजन समिती व भारतीय जनता पार्टी, कराड शहर यांच्यावतीने भाजपचे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात कृष्णा महोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कराडचे माजी नगरसेवक सुहास जगताप, मुकुंद चरेगावकर, रमेश मोहिते, महादेव पवार, प्रमोद शिंदे, उमेश शिंदे आदी. उपस्थित होते. शहराध्यक्ष बागडी म्हणाले, कृष्णा महोत्सवास आज शुक्रवारी (दि. 31 रोजी) प्रारंभ होणार आहे. यादिवशी येथील वेणूताई चव्हाण सभागृहात सकाळी 10 वाजता आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थ्यांना स्मार्ट कार्डचे वाटप व कराड शहरातील आशासेविकांचा सन्मान करण्यात येणार आहे. शनिवार (दि. 1) एप्रिल रोजी येथील प्रीतिसंगम घाटावर सायंकाळी 6 वाजता ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास चित्रपट अभिनेत्या क्रांती मुळगावकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या स्पर्धेमध्ये एक ते पाच क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक बक्षीस, तसेच सर्व उपस्थित महिलांना खास भेटवस्तू देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी सर्व महिलांना हमखास भेटवस्तू व या स्पर्धेतील प्रत्येक खेळानंतर लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.
तर रविवार (दि. 2 रोजी) भव्य ‘कृष्णा रन मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कराड येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे सकाळी 6 वाजता पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मॅरेथॉन स्पर्धेस प्रारंभ करण्यात येणार आहे. सदरची मॅरेथॉन पाच विविध वयोगटात 5, 10 व 21 किलोमीटर अंतराची असून लहान गटासाठी शिवाजी हायस्कूल-दत्त चौक-मुख्य पेठ लाईन-चावडी चौक-कृष्णा नाका ते पुन्हा शिवाजी हायस्कूल, तर खुल्या गटासाठी शिवाजी हायस्कूल-ओगलवाडी रेल्वे पुल ते पुन्हा शिवाजी हायस्कूल असा ट्रॅक असणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांसह इतर राज्यातील मिळून एकूण 1 हजार स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. मॅरेथॉनसाठी 14 वर्षाखालील एक वयोगट, तसेच 14 वर्षानंतर प्रत्येकी 10 वर्षे वयोगटाच्या फरकाने असे एकूण पाच स्वतंत्र गट करण्यात आले आहेत. मॅरेथॉनसाठी 300 रुपये नाममात्र प्रवेश फी ठेवण्यात आली असून त्यामधून सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट, बीप मशीन व अन्य वस्तूंचे कीट देण्यात येणार आहे.
तसेच याच दिवशी रविवार (दि. 2 रोजी) येथील प्रीतिसंगम घाटावर सायंकाळी 6 वाजता ‘भूपाळी ते भैरवी’ या हरवत चाललेल्या मराठमोळ्या लोककलांचा रांगडा अविष्कार सादर करण्यात येणार आहे. तर महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी प्रीतिसंगम घाटावर सायंकाळी 6 वाजता ग. दि. माडगूळकर यांचे गीतारामायण हा कार्यक्रम पुणे येथील रंगयात्री ग्रुपच्यावतीने सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे या महोत्सवाचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही आयोजकांकडून यावेळी करण्यात आले.