गमेवाडीत बिबट्याचा तर आरेवाडीत शाळकरी मुलांवर कुत्र्याचा हल्ला : एका वृध्देसह 5 मुले व 2 जनावरे जखमी
कराड | कराड तालुक्यातील गमेवाडी येथे बिबट्याने हल्ला केल्याने शेतकरी जखमी झाला तर दुसरीकडे तेथूनच 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या आरेवाडीतील शाळकरी मुलांवर भटक्या कुत्र्याने हल्ला करून चावा घेतला आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात आरेवाडीतील 4 तर साजूर गावातील दोघांना चावा घेतला असून दोन जनावरांनाही चावले आहे. बिबट्या आणि कुत्र्याच्या हल्ल्यामुळे तांबवे परिसरातील आरेवाडी, गमेवाडी भागात भीतीचे वातावरण आहे.
आरेवाडी येथे शाळेतून घरी निघालेल्या साक्षी राजेंद्र देसाई (इ. 9 वी) तर आरेवाडी जिल्हा परिषद शाळेतील ऋषभ गणेश देसाई (इ. 1 ली), श्रेयस संभाजी तिकुडवे (इ. 3 री), मल्हार गजेंद्र कुंभार (इ. 2 री, सर्व रा. आरेवाडी, ता. कराड) आणि साजूर मधील हिराबाई चद्रकांत भिगांरदेवे (वय- 75), श्रीकांत युवराज साठे (वय- 15) यांना कुत्र्याने चावा घेतला. तर शरद गरूड व गणेश नलावडे यांच्या जनावरांनाही कुत्र्याने चावा घेतला आहे. असे पाच जण जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अंकुश नांगरे, शिक्षक विकास देसाई, ए. वाय. कदम यांनी तातडीने कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. केंद्रप्रमुख निवास पवार यांनी दवाखान्यात जावून विद्यार्थ्यांची विचारपूस केली.
गमेवाडी येथील 70 वर्षीय बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी पोपट बाळकृष्ण जाधव (रा. गमेवाडी, ता. कराड) यांच्यावरही वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले. गमेवाडी येथील बिबट्याचा व आरेवाडी परिसरातील पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वनविभाने तातडीने मनुष्यावर हल्ला केल्याने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे. तसेच कुत्र्यांचाही बंदोबस्त करावा, अन्यथा शाळेत मुले पाठविण्यास पालकांच्यात भीती असल्याचे पहायला मिळत आहे.