बहुलेत बिबट्याचा मेंढराच्या कळपावर हल्ला : 1 शेळी ठार
पाटण | मल्हारपेठ विभागात असलेल्या बहुले (ता. पाटण) गावामध्ये मेंढरांच्या कळपात घुसून बिबट्याने हल्ला चढवला. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी जागीच ठार झाली. या घटनेने मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पाटण तालुक्यातील बहुले गावच्या शिवारात राजेंद्र मोहन साठे यांचा मेंढ्यांचा कळप एका शेतात बसायला होता. त्या कळपावर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवला. एका मेंढीला त्याने जागीच ठार केले. या घटनेत राजेंद्र साठे यांचे सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी शिवाजी कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
वनरक्षक मेघराज नवले यांनीही त्याठिकाणी भेट दिली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठे नुकसान होत आहे. बहुले विभागातील हावलेवाडी, जरेवाडी, गारवडे, पाळेकरवाडी याठिकाणी अशाच प्रकारचे हल्ले झाल्याने सुमारे पंचवीस शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले.