उरूलला 31 कोंबड्या बिबट्याने केल्या फस्त : ठोमसे रस्त्यावर बिबट्या ठार

पाटण | उरुल (ता. पाटण) येथे 19 कोंबडे आणि 12 कोंबड्या अशी एकूण 31 कोंबड्या बिबट्याने मध्यरात्री फस्त केल्या. तर तेथूनच पुढे 500 मीटर अंतरावर अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला आहे. सदरील घटनेचा पंचनामा वनविभागाने केला असून बिबट्याच्या वावरामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, आज शनिवारी नवसरी येथील स्मशानभूमीत वनविभागाकडून मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, उरूल- ठोमसे येथील ग्रामस्थ विक्रम माने, आबा माने व राजेंद्र माने हे शुक्रवारी मध्यरात्री घराकडे जात असताना पवार वस्तीजवळील रस्त्यामध्ये मृतावस्थेत बिबट्या दिसला. त्यांनी त्वरित घटनेची माहिती वनविभागास दिली. रात्री दोनच्या सुमारास वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पवार मळ्यानजीक जाऊन तेथील दोन-तीन ग्रामस्थांना बरोबर घेऊन घटनास्थळी भेट दिली. यावेळी बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला. अज्ञात वाहनांच्या धडकेत अंदाजे नऊ महिन्यांची मादी जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाला. डोक्याजवळ अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्यामुळे बछड्याची आई आसपास परिसरात असण्याची शक्यता असल्याने सावध भूमिका घेत वनविभागाने बछड्याला तेथून मल्हारपेठ येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले.
उरूल येथील कोतवाल असलेले निवास सुतार यांच्या जुगाईच्या मळ्यातील शेडात 32 कोबडे व कोंबड्या होत्या. त्यापैकी 31 कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या. यावेळी जाळीतील कोंबडीवरही बिबट्याने हल्ला केला, परंतु जाळीतील कोंबडीची शिकार करण्यात बिबट्याला अपयश आले. तेथूनच 500 मीटर अंतरावर उरूल- ठोमसे मार्गावर पवार वस्ती नजीक बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला. या दोन्ही घटनेमुळे बिबट्याचा वावर उरूल- ठोमसे परिसरात असल्याने लोकांच्यात भीती निर्माण झाली आहे.
वनविभागाला सकाळी 7 वाजता माहिती अन् पोहचले दुपारी 1. 30 वाजता
बिबट्याच्या बछड्याचा मध्यरात्री मृत्यू झाल्याचे समजताच वनविभागाचे कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परंतु, उरूल येथील निवास सुतार यांच्या शेडातील कोंबड्याचा पंचनामा करण्यासाठी सकाळी 7 वाजता माहिती दिल्यानंतर दुपारी 1.30 वाजता वनविभाग घटनास्थळी पोहचले. त्यामुळे लोकांच्यातून संताप व्यक्त केला गेला. त्यामुळे मृत प्राणी बिबट्याच्या मदतीला धावलेले वनविभाग लोकांच्यासाठी केव्हा धावणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.