हजारमाचीत एका घरात बिबट्याची कातडी आणि प्राण्यांची अवयवे छाप्यात सापडली
कराड । हजारमाची (ता. कराड) येथील एका घरावर पुण्याच्या वन विभागाने सोमवारी छापा टाकला. पथकाने झडती घेतली असता घरात बिबट्याची कातडी, गवा, भेकर आणि हरणांची शिंगे तसेच इतर संशयास्पद वस्तू आढळून आल्या आहेत. वन्यजीवांच्या अवयवांसह इतर वस्तू वन विभागाने जप्त केल्या असून त्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्या जाणार आहेत. एका महिलेच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.
वन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हजारमाची मूळ गाव असलेल्या विश्वजीत जाधव आणि अभिजीत जाधव यांचे पुण्यातील खडकवासला धरणालगत असलेल्या मांडवी बुद्रूक गावातील एका फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसमध्ये शिकार केलेला बिबट्या ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक दीपक पवार, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, डोणजे वनपरिमंडळ अधिकारी सचिन सपकाळ आणि पथकाने संबंधित फार्म हाऊसवर छापा टाकला. तेथून बिबट्याच्या नख्यांसह पंजे जप्त केले. त्याप्रकरणी विश्वजीत जाधव आणि अभिजित जाधव (दोघे सध्या रा. डेक्कन जिमखाना) यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. संबंधित संशयीतांचे मुळगाव हजारमाची आहे. त्यामुळे पुण्याचे वनाधिकारी सपकाळ यांच्यासह त्यांच्या पथकाने सोमवारी हजारमाचीत जाधव यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी त्यांना अनेक संशयास्पद गोष्टी हाती लागल्या आहेत. बिबट्याच्या कातड्यासह गवा, हरण व भेकराची शिंगेही सापडली आहेत. वन विभागाने वन्यजीवांचे हे अवयव जप्त केले आहेत.
एका महिलेची तक्रार अन् प्रकार उघडकीस
दरम्यान, जाधव यांच्याकडे बिबट्याचे कातडे असल्याची तक्रार एका महिलेने पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी याबाबतची प्राथमिक चौकशी करुन वन विभागाकडे तक्रार हस्तांतरीत केली. त्यानंतर वन विभागाकडून कारवाई करण्यात आली. त्यामध्ये विश्वजीत व अभिजीत जाधव या दोघांकडे वन्यजीवांचे अवयव आढळून आले असल्याची माहिती वनाधिकारी संपकाळ यांनी दिली.