लोकार्पण : डेरवणच्या पिता- पुत्रांनी जपली सामाजिक बांधिलकी
![Dervan Patan](https://hellonews.co.in/wp-content/uploads/2023/06/hellonews.co_.in-2023-06-29T210510.518-780x470.jpg)
चाफळ । समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, अशी भावना असणारे लोक बोटावर मोजण्या इतकेच समाजामध्ये आहेत. अशा भावनेतूनच मौजे डेरवण- चाफळ (ता. पाटण) येथील पिता- पुत्रांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गावासाठी स्वतःची जागा देत, त्याठिकाणी सर्वसोयीनियुक्त स्मशानभूमी शेड बांधत त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला.
चाफळ विभागातील डेरवण (ता. पाटण) येथील ज्येष्ठ नागरिक सर्जेराव यादव व त्यांचे सुपुत्र माजी सरपंच अभय यादव यांनी गावासाठी स्वः तच्या जागेत स्वः खर्चाने सर्वसोयीनीयुक्त अशी स्मशानभूमी व शेड बांधून दिली आहे. या ठिकाणी विजेची, पाण्याची सोय करण्यात आली आहे. गावामध्ये दहा वर्षापूर्वी बांधलेल्या स्मशानभूमी शेडला पोहच रस्त्याची अडचण असल्यामुळे ते शेड वापराविना पडून होते. त्यामुळे गावातील लोकांना अंत्यविधीवेळी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. गावातील लोकांची गैरसोय पाहता पिता- पुत्रांनी गावाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपत, याकामी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतः च्या जागेत स्वः खर्चाने स्मशानभूमी शेडचे बांधकाम करून लोकांची समस्या कायम स्वरुपी सोडवली.
अनेक वर्षांपासून होणारी गैरसोय दूर केल्यामुळे ग्रामस्थांनी यादव कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. लोकार्पण सोहळ्यास पोलीस उपनिरीक्षक सुनील माने, आत्माराम माने, आनंदराव बाकले, माजी सरपंच पांडुरंग यादव, आनंदा महिपाल, संदीप यादव, चंद्रकांत यादव, संजय आनंदराव यादव, अधिक यादव, निलेश सोनवले, युवराज यादव, धोंडीराम लोहार, राहुल लोहार, मच्छिंद्र यादव उपस्थित होते.