विंग येथे दागिने पाॅलिश करून देण्याच्या बहाण्याने सोन्याची तूट : अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल
कराड | विंग (ता. कराड) येथे आज सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने पाच तोळ्याच्या बांगड्या घेऊन त्या वितळवत 24 ग्रॅम सोन्याची तूट करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत भगवान केशव खबाले यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात दोन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विंग येथे दोन युवकांनी एका कुटुंबातील महिलांना दागिने पॉलिश करून देतो, असे सांगितले. त्यावेळी भगवान खबाले यांच्या पत्नी अनुराध व भावजय अश्विनी खबाले यांनी त्यांचे चांदीचे पैंजण पॉलिश करून घेतले. यानंतर युवकांनी अनुराधा यांच्या हातातील एका बांगडीवर पावडरीने पॉलिश करून ती चकाकत असल्याचे दाखवले. त्यामुळे अनुराधा यांनी हातातील चार बांगड्या काढून पॉलिशसाठी दिल्या. त्यानंतर युवकांनी एका छोट्या भांड्यात बांगड्या टाकून त्यामध्ये पाणी आणि त्यांच्याकडे असणारा लाल रंगाचा द्रव टाकला. काही वेळाने डिझेल आणि कापूस पेटवून संबंधित भांडे गरम केले. त्या उकळत्या पाण्यात त्यांनी बांगड्या गरम केल्या. काही वेळानंतर त्यांनी पाण्यातून बांगड्या बाहेर काढून त्यांच्याकडील ब्रशने घासून पॉलिश केले. एका वाटीत त्यांनी त्या बांगड्या ठेवल्या. तसेच त्यावर हळद आणि एक लिक्विड टाकले. पाच मिनिटानंतर वाटीतून या बांगड्या बाहेर काढा. अन्यथा त्या काळ्या पडतील, असे सांगून संबंधित दोन्ही युवक तेथून निघून गेले.
दरम्यान, काही वेळानंतर अनुराधा खबाले यांनी वाटीत ठेवलेल्या त्या बांगड्या काढून पाहिल्या असता त्यातील तीन बांगड्या तुटलेल्या दिसून आल्या. तसेच त्यांचे वजनही कमी वाटले. त्यामुळे भगवान खबाले व अनुराधा यांनी गावातील एका दुकानात जाऊन बांगड्यांचे वजन करून घेतले असता ते 26 ग्रॅम भरले. 24 ग्रॅम वजनाची घट त्यांना दिसून आली. संबंधित युवकांनी बांगड्या पॉलिश करताना त्या वितळवून आपली फसवणूक केल्याचे खबाले यांच्या निदर्शनास आले. संबंधित युवकांनी सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांच्या सोन्याची तुट केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.