अपत्य प्राप्तीचे आमिष : तळबीड नंतर कराड शहरातही गंडा, साताऱ्यातील बहीण- भावाला अटक

कराड | तळबीड परिसरातील दाम्पत्याला घालणाऱ्या गंडा टोळीने कराड शहर परिसरातील दाम्पत्यालाही गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर या टोळीला सातारा शहरातील एका महिलेसह संशयिताने सहकार्य केले असल्याचे समोर आले आहे. साताऱ्यातील संशयितामध्ये बहिण – भाऊ असे नाते असून त्या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणातील संशयितांची संख्या सहावर गेली आहे.
परजिल्ह्यातील तीन दिवसांपूर्वी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसताना अपत्य प्राप्तीचे आमिष दाखवून तळबीड परिसरातील एका दाम्पत्यास परजिल्ह्यातील चौघांच्या टोळीने लाखो रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या प्रकरणी तळबीड पोलिसांनी राहूल धरमगिरी गोसावी उर्फ नारायण वैद्य (वय- 32, रा. तिरंगानगर साक्री, ता. साक्री, जि. धुळे), अश्विन अशोक गोसावी (वय- 34, रा. गोसावीवस्ती वैद्यवाडी, हडपसर पुणे, मूळ रा. वाकोत, ता. जामनेर जळगाव), शैलेश सुरेश गोसावी (वय- 22, रा. तिरंगानगर साक्री, ता. साक्री, जि. धुळे) आणि देवेंद्र ज्ञानेश्वर पवार (वय- 32, सुशिलानगर, साक्री जि. धुळे) या चौघांना अटक केली होती. तर इलियास राशिद शेख, रेश्मा राशिद शेख (दोन्ही रा. करंजे पेठ, सातारा) या दोन संशयितांनी चौघांच्या टोळीस सहकार्य केल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधिकारी अर्जुन चोरगे यांनी सांगितले.
संशयित राहुल गोसावी याने नारायण वाघ वैद्य हे आपले नाव असल्याचा बनाव करत तळबीड परिसरातील एका दाम्पत्याप्रमाणेच कराड शहरातील दाम्पत्याला या टोळीने 72 हजारांची औषधे दिली होती. तसेच प्रवास खर्चाची रक्कम म्हणून 2 हजार रूपये स्वतंत्र घेतले होते. मात्र काहीच फरक न पडल्याने दाम्पत्याने कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यात तळबीड पोलिसांनी अटक केलेल्या चौघा संशयितांसह साताऱ्यातील दोन संशयितांचाही समावेश असल्याचे पोलिस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे यांनी सांगितले.