व्हिडीओ बनविणे आले अंगलट : मध्य प्रदेशातील फरार तरुण- तरुणीला पाटणमध्ये अटक
पाटण | मोराच्या अंगावरची पिसे उपसून त्याचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियात व्हायरल करणे चांगलेच अंगलट आले आहे. या व्हिडीओ मधील संशयित मध्यप्रदेशातून फरार झाले, मात्र, या गुन्ह्याचा शोध घेणारे वनविभागाचे अधिकारी चक्क सातारा जिल्ह्यातील बेलवडे गावात पोहचले. संबंधित आरोपी आणि त्याच्या सोबतच्या युवतीला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेश येथील रिठी वनपरिक्षेत्रातीलच एका युवकाने व युवतीने वनक्षेत्रात एक मोर पकडला होता. या मोराची पिसे उपसून काढतानाचा व्हिडिओ तयार केला होता. संबधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्यप्रदेशातील वनकर्मचाऱ्यांनी संशयितांचा शोध सुरू केला. वनकर्मचारी शोध घेत असल्याचे समजल्याने अतुल हा युवतीसोबत त्या ठिकाणाहून पसार झाला होता. संशयित आरोपी व युवती सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असल्याची माहिती रिठी वनविभागास मिळाली होती. यानुसार त्यांनी सातारा उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांना याची माहिती दिली.
सहायक उपवनसंरक्षक महेश झांजुर्णे यांनी पाटणचे वनक्षेत्रपाल, कर्मचारी, फिरत्या पथकास माहिती देत संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. यानुसार पाटण तालुक्यातील बेलवडे खुर्द गावाजवळून या संशयितांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर त्याची माहिती मध्य प्रदेश वनविभागास देण्यात आली. ताब्यात घेतलेल्या संशयितांना पाटण न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य प्रदेश वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.