महाठग : शिक्षण व पोलिस खात्यात नोकरीचे आमिषाने 28 लाखांची फसवणूक
फलटण | सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फलटण तालुक्यातील 6 जणांची तब्बल 28 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली असून एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर किसन चिरमे (रा. पाटस, ता. दाैंड, जि. पुणे) असे गुन्हा नोंद झालेल्या संशयिताचे नाव आहे. शंकर किसन बोंद्रे (वय- 51, रा. खामगाव, ता. फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर चिरमे याने जून 2019 साली त्यांची सून पल्लवी बोंद्रे यांना उपशिक्षणाधिकारी पदावर नोकरी लावतो, असे सांगून 6 लाख 50 हजार रुपये घेतले. सून शिक्षण विभागाची परीक्षा पास झालेबाबत बनावट पत्र ईमेलवर पाठवले. त्याचप्रमाणे त्यांची दोन्ही मुले सौरभ व ओंकार यास पोलिसमध्ये भरती करण्यासाठी चिरमे याने 9 लाख रुपये घेतले. शंकर बोंद्रे यांच्या ओळखीचे महादेव ढवळे यांची पुतणी प्रीती संजय ढवळे हिला पोलिस खात्यामध्ये भरती करण्यासाठी चिरमे याने त्याचे बँक खात्यावर 1 लाख 80 हजार व 1 लाख 20 हजार रोख घेतले.
तसेच जगन्नाथ गायकवाड यांनी त्यांचा मुलगा अनिकेत यास पोलिस खात्यात भरती करण्यासाठी चिरमे यास साडेचार लाख रुपये रोख दिले व 50 हजार रुपये बँक खात्यावर पाठवले होते, तसेच चैतन्य हिंदुराव घाडगे याला देखील पोलिस खात्यामध्ये भरती करतो, असे सांगून साडेचार लाख रुपये, त्याचे कडून घेतले आहेत. ज्ञानेश्वर चिरमे याने सर्वांना सरकारी नोकरी लावतो, असे सांगून पैसे घेऊन सर्वांची फसवणूक केली आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शिंदे करीत आहेत.