सह्याद्री कारखान्यावर कुस्तीच्या मैदानात महेंद्र गायकवाडने हरियाणाच्या मल्लाला केले चितपट
मसूर प्रतिनिधी। गजानन गिरी
यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर ज्येष्ठ नेते स्व. पी. डी. पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सह्याद्री गणेशोत्सव मंडळ व सह्याद्री सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात पुण्याच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचा मल्ल महेंद्र गायकवाडने हरियाणा लाडपूरच्या खेळू आखाड्याचा मल्ल उमेश मथुरा यास पाच मिनिटात चितपट केले. गायकवाडने कुस्ती जिंकताच कुस्ती शौकीनांनी एकच जल्लोष केला. गायकवाड सह्याद्रीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. कुस्ती मैदानात अनेक मल्लानी चटकदार कुस्त्या केल्या.
महेंद्र गायकवाड व उमेश मथुरा यांची कुस्ती माजी सहकार व पणनमंत्री, आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने ,उपमहाराष्ट्र केसरी काकासो पवार, संचालक जशराज पाटील, मानसिंगराव जगदाळे,संजय थोरात, लालासाहेब पाटील,कांतीलाल पाटील,संजय कुंभार, गजानन चव्हाण, जितेंद्र पवार, पैलवान संतोष वेताळ यांच्या उपस्थितीत लावण्यात आली. या मैदानात माऊली कोकाटे, विकी चहर, दादा शेळके, कपिल धामा, सुबोध पाटील, पृथ्वीराज मोहोळ, शुभम शिंदनाळे, संदिप मोटे, गणेश कुंकुले, संतोष जगताप, प्रशांत शिंदे, सुनिल फडतरे, सातपाल सोनटक्के, समीर शेख, कालीचरण सोलनकर, मनीष रायते, अंकित मथुरा, रविराज चव्हाण यांच्यासह इतर मल्लांनी चटकदार कुस्त्या केल्या. यावेळी मैदानात ऑलिम्पिक पद्धतीच्याही कुस्त्या झाल्या.
कुस्तीचे समालोचन सांगलीच्या जोतीराम वाझे यांनी केले. त्यांना आर. जी. तांबे यांनी सहकार्य केले. गतवर्षी पावसामुळे मैदान रद्द करण्यात आले होते. याची खबरदारी म्हणून यावर्षी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक जशराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती मैदानावर पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते. कुस्ती क्षेत्राला सन्मान मिळावा व ग्रामीण भागातील पैलवानांना कुस्तीची प्रेरणा मिळण्यासाठी सह्याद्रीवर कुस्त्यांचे मैदान आयोजित केल्याचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. कुस्ती मैदानाला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर ,सोलापूर जिल्ह्यातील मल्लांनी हजेरी लावली होती. कुस्त्या पाहण्यासाठी हजारो कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती. या मैदानाचे सह्याद्री कारखान्याचे संचालक जशराज पाटील, सर्व संचालक, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.