पाटण तालुक्यात ग्रामपंचायतीला चुरस : मल्हारपेठला दुपारी 2 पर्यंत 65 टक्के मतदान, टक्का वाढला
पाटण | पाटण तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीसाठी सकाळी 7 वाजलेपासून मतदानाला चुरशीने सुरूवात झाली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदार संघात मल्हारपेठ या ग्रामपंचायतीला मतदानाला मतदारांची गर्दी दिसून आली. दुपारी 2 वाजेपर्यंत 65 टक्के मतदान झाल्याने सायंकाळी 5 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर मतदान होणार असल्याचे दिसत आहे. यामुळे सत्ताधारी सत्ता ठेवणार कि विरोधक सत्तांतर करणार हे उद्या 10 वाजेपर्यंत समजणार आहे. पाटण तालुक्यात मल्हारपेठ ग्रामपंचयातीची निवडणूक पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरलेली दिसून येत आहे. उद्या सकाळी पाटण येथे मतमोजणी पार पडणार आहे.
मल्हारपेठ ग्रामपंचायतीत ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट यांची सत्ता होती. मल्हारपेठ ही पाटण तालुक्यातील महत्वपूर्ण ग्रामपंचायत असल्याने याठिकाणी अटीतटीची लढत होताना दिसत आहे. यामुळेच सकाळपासून या ग्रामपंचायतीच्या प्रत्येक मतदान केंद्रावर मोठी गर्दी दिसून येत आहे. तसेच मतदानाची टक्केवारी वाढली जाणार असून वाढलेले मतदान कोणाला धक्का देणार हे सोमवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत समजणार आहे. या निवडणुकीत खरेतर शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिवसेनेचा शिंदे गट यांच्यात खरी लढत होत असून दोन्ही गटाची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे. याठिकाणी मल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस फाैजफाटा तैनात करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतील 3700 मतदान असताना दुपारी 2 वाजेपर्यंत 65 टक्के मतदान झाल्याने नक्की मतदार सत्ताधाऱ्यांना की विरोधकांना धक्का देणार याबाबात चर्चा रंगू लागल्या आहेत. जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी मोठी यंत्रणा राबवलेली दिसून येत आहे. या ग्रामपंचायतीला सरपंच पदासाठी दशवंत भावकीतील दोन्ही उमेदवार असून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून किरण दशवंत हा तरूण चेहरा देण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीकडून मोहन दशवंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हायटेक प्रचार यंत्रणा
मल्हारपेठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी हायटेक प्रचार यंत्रणा राबविण्यात आली. यामध्ये सोशल मिडिया सोबत, बॅंनर, ध्वनीक्षेपक यंत्रणा यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. विधानसभेची रंगीत तालीम म्हणावी, अशी निवडणूक याठिकाणी दोन्ही गटाकडून लढवली जात आहे.